कात्रजमध्ये एकाच दिवशी तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:40+5:302021-05-18T04:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धनकवडी : भारती विद्यापीठ परिसरात तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे एकाच दिवशी सोमवारी (दि. १७) उघडकीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धनकवडी : भारती विद्यापीठ परिसरात तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे एकाच दिवशी सोमवारी (दि. १७) उघडकीस आले.
निरंजन बाळकृष्ण साळुंखे (वय ३५, रा. वर्धापन बिल्डिंग, वंडरसिटीजवळ) या तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निरंजन हा वाहनचालक होता. गेल्या महिन्यापासून तो बेरोजगार होता. त्याचा मित्र निरंजन याला दररोज जेवणाचा डबा आणून देत असे. तो मित्र शनिवारी रविवारी आला नव्हता. सोमवारी दुपारी डबा घेऊन आला तेव्हा निरंजनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
पोपट पांडुरंग सलगर (वय ४०, रा. सुखसागरनगर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोपट याची दोन्ही मुले गावाला गेली आहेत. पत्नी कामाला बाहेर गेली होती. त्यामुळे तो एकटाच घरी होता. त्याचा मित्र सतत फोन करीत होता. मात्र, पोपट फोन उचलत नसल्याने मित्र घरी गेल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
राजीव गांधी उद्यानासमोर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघड झाले. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी, मोबाईल अथवा ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू नव्हती, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.