वीजवाहक तारा तुटल्याने तीन गायींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:35+5:302021-05-25T04:12:35+5:30
खोडद : गोठ्यावरून गेलेल्या वीजवाहक तारा तुटून गोठ्यात वीजप्रवाह आल्याने गोठ्यातील ५ गायींपैकी ३ गायींचा जागीच मृत्यू झाला. ...
खोडद : गोठ्यावरून गेलेल्या वीजवाहक तारा तुटून गोठ्यात वीजप्रवाह आल्याने गोठ्यातील ५ गायींपैकी ३ गायींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२४ ) सकाळी ९ वाजता हिरवे तर्फे नारायणगाव येथे घडली.
एकनाथ भिमाजी कुंडलिक यांच्या गोठ्यात ही घटना घटली. त्यांच्या गोठ्यात ५ गायी आहेत. गायींच्या दुग्धव्यवसायावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सकाळी त्यांनी गायींना चारा टाकला होता. सकाळी ९ च्या सुमारास गोठ्यावरून गेलेल्या तीन वीज वाहक तारा अचानक तुटून गोठ्यावर पडल्या.
वीज वाहक तारा गोठ्यावर पडताच क्षणी गोठ्यात सर्वत्र विजेचा प्रवाह पसरला. यावेळी गोठ्यात बांधलेल्या ५ गायींपैकी ३ गायींचा तडफडून जागेवरच मृत्यू झाला. यावेळी एकनाथ कुंडलिक यांची पत्नी वर्षा एकनाथ कुंडलिक व पुतण्या युवराज दगडू कुंडलिक यांनी तात्काळ गोठ्याचा दरवाजा उघडून गोठ्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण गोठ्यात विजेचा प्रवाह पसरल्याने दरवाजाला हात लावताच वर्षा कुंडलिक व युवराज कुंडलिक हे दोघेही विजेच्या धक्क्याने दूर फेकले गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही.
कोट
एकनाथ कुंडलिक यांच्या गायींच्या मृत्यूने जे काही नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई देण्यात येईल. गावातील जुन्या व जीर्ण वीजवाहक तारा एकाचवेळी बदलणे शक्य नाही पण टप्याटप्याने या सर्व तारा बदलण्यात येतील.
- दत्तात्रय जाधव
सहाय्यक अभियंता, नारायणगाव