दहशत पसरविणारे तीन तडीपार गुंड जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 09:35 PM2018-03-11T21:35:08+5:302018-03-11T21:35:08+5:30
पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही शहरात येऊन लोकांना मारहाण करुन दहशत पसरविणा-या तिघा गुंडांसह सात जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे़
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही शहरात येऊन लोकांना मारहाण करुन दहशत पसरविणा-या तिघा गुंडांसह सात जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे़
टिक्या ऊर्फ श्रीनाथ अशोक शेलार (वय २०, रा़ घोरपडे पेठ), राहुल शाम भरगुडे (वय २२, रा़ साठे कॉलनी, सदाशिव पेठ) आणि विपुल बबनराव इंगवले (वय २१, रा़ खडक माळ आळी) अशी तडीपार गुंडांची नावे आहेत़ त्यांच्यासह सागर ऊर्फ भेंड्या दत्तात्रय शिंदे (वय २८, रा़ पीएमसी कॉलनी, घोरपडे पठे), सोन्या ऊर्फ जयंत प्रमोद शेलार (वय २२, रा़ वसंतलता सोसायटी, कात्रज -कोंढवा रोड व झगडेवाडी, घोरपडे पेठ), अक्षय संजीव जाधव (वय २१, रा़ कैकाड आळी, घोरपडे पेठ), अनिकेत पांडुरंग नवगिरे (वय २२, रा़ पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बसवराज गुंडप्पा कत्रे (वय ३०, रा़ इंदिरानगर, गुलटेकडी) हे त्यांच्या मित्रांसह पीएमसी कॉलनी येथे राहणारे अमीर दिलावर शेख यांच्या व त्यांच्या पत्नीमध्ये झालेला वाद मिटविण्यासाठी ५ मार्चला त्यांच्या घरी गेले होते़ त्यावेळी सागर शिंदे व त्याचे साथीदार तेथे येऊन कत्रे यांना तुम्ही येथे का आला़ तुमचा काय संबंध असे म्हणून तुम्ही निघून जा, असे सांगितले़ त्याचा जाब विचारल्यावरुन कत्रे व त्यांचे मित्र प्रसाद जोरी यांना लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले होते़
या गुन्ह्याचा तपास करताना सागर शिंदे याला पकडल्यानंतर इतरांची नावे स्पष्ट झाले़ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून इतरांना वेगवेगळ्या ठिकाणी पकडले़ श्रीनाथ शेलार यांच्या विरुद्ध जबरी चोरी, अपहरण, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी असे ५ गुन्हे आहेत़ राहुल भरगुडे यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत, घातक शस्त्रे बाळगणे, दंगा मारामारी असे ४ गुन्हे आहेत़ विपुल इंगवले याच्याविरुद्ध दरोड्याची तयारी, दंगा मारामारी, अपहरण, दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे ८ गुन्हे दाखल आहेत़ पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी या तिघांना पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते़ त्यांना पोलिसांनी अटक केली आहे़ न्यायालयाने त्यांना १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़
पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक निरीक्षक उमाजी राठोड, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे तसेच कर्मचारी विजय कांबळे, विनोद जाधव, विश्वनाथ शिंदे, बापू शिंदे, राकेश क्षीरसागर, गणेश सातपुते, रवि लोखंडे, संदीप कांबळे, अनिकेत बाबर, महेश कांबळे यांनी ही कामगिरी केली़