भीमाशंकर भक्तनिवासासाठी तीन कोटी : चंद्रकांत पाटील
By admin | Published: December 31, 2016 05:26 AM2016-12-31T05:26:05+5:302016-12-31T05:26:05+5:30
श्रीक्षेत्र भीमाशंकर भक्तनिवास सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ३ कोटी रुपये तत्काळ दिले जातील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
घोडेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकर भक्तनिवास सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ३ कोटी रुपये तत्काळ दिले जातील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना भीमाशंकर भक्तनिवासच्या केलेल्या पाहणीत दिले. तसेच, या भक्तनिवासासाठी वाढीव २ कोटींचा प्रस्ताव व डिंभे गार्डनच्या कामासाठी १३ कोटींचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार करून सादर करावा, असे आदेश अधिकाऱ्यांनी त्यांनी या वेळी दिले.
भीमाशंकर दर्शनासाठी चंद्रकांत पाटील सपत्नीक आले होते. दर्शनाअगोदर त्यांनी भीमाशंकर भक्तनिवासाच्या कामास भेट दिली. या वेळी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. भक्तनिवासाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असून, यामध्ये ९० खोल्या व सर्व सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. मात्र या भक्तनिवासाची संरक्षक भिंत, गार्डन व किरकोळ कामामुळे हे काम सुरू होऊ शकत नाही. यासाठी २ कोटी ९२ लाख रुपयांची आवश्यकता असून, ही रक्कम मिळाल्यास पुढील तीन महिन्यांत भक्तनिवास सुरू होईल. या भक्तनिवासाची जागा महसूल विभागाची असून, सार्वजनिक बांधकाम विभाग याचे बांधकाम करत आहे. तर भक्तनिवास बांधून झाल्यावर एमटीडीसी ते चालविणार आहे. संपूर्ण बांधकाम पूर्ण होईपर्यंत एमटीडीसी ते ताब्यात घेत नाही, असे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. मंत्र्यांनी सर्व गोष्टी समजून घेऊन तत्काळ पैसे देण्याचे कबूल केले तसेच वाढीव दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
डिंभे गार्डनचे कामदेखील थांबले असून, यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. कामाला आवश्यक असलेल्या १३ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करा, यालाही मंजुरी देऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
या वेळी कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, प्रांताधिकारी सुनील गाडे, आंबेगाव तहसीलदार रवींद्र सबनीस, खेड तहसीलदार सुनील जोशी, उपअभियंता एल. टी. डाके, आर.आर. सोनवणे, देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त सुरेश कौदरे, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, सुभाष तळपे, संजय गवारी, इंदुबाई लोहकरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)