हडप्पा संस्कृतीतील आर्यांचा थ्री-डी चेहरा तयार, डॉ. वसंत शिंदे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 06:13 AM2019-10-11T06:13:00+5:302019-10-11T06:13:28+5:30
भारत, अमेरिका आणि जर्मन या देशातील शास्त्रज्ञांनी एकत्रित संशोधन करून हडप्पा संस्कृतीमधील लोक हे बाहेरून आले नसल्याचे शास्त्रीय पुराव्यासह मांडले होते.
पुणे : हडप्पा संस्कृतीतील लोक बाहेरून आलेले नसून, ते मूळचे भारतीयच असल्याचे पुरातत्वीय व जनुकीय पुराव्यातून दिसून आले आहे. त्यातच संगणकीय प्रोग्रामच्या मदतीने येथील लोक कसे दिसत असावेत, याचे थ्रीडी चेहरे तयार केले आहेत. त्यामुळे प्रथमच हडप्पा संस्कृतीमधील लोकांचा चेहरा जगासमोर आला. या पुराव्यांआधारे हडप्पातील लोक भारतीयच होते, हे ठामपणे सांगता येऊ शकते, असे डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भारत, अमेरिका आणि जर्मन या देशातील शास्त्रज्ञांनी एकत्रित संशोधन करून हडप्पा संस्कृतीमधील लोक हे बाहेरून आले नसल्याचे शास्त्रीय पुराव्यासह मांडले होते. त्यात डॉ. वसंत शिंदे यांनी अमेरिकेतील ‘अॅनॅटॉमिकल सायन्स इंटरनॅशनल’ या जर्नलमध्ये ‘क्रेनियोफेशियल रिकन्स्ट्रक्शन आॅफ दि इंडस व्हॅली सिव्हिलायजेशन अ इंडिव्हिज्युल्स स्पाऊंडस अॅट ४,५०० इयर्स ओल्ड राखीगडी सिमेट्री’हा पेपर प्रसिद्ध केला आहे.
डॉ. शिंदे म्हणाले की, हडप्पा काळापासून आत्तापर्यंत माणसाच्या शरीरयष्टीत कोणताही बदल दिसत नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी येथे येऊन संस्कृती स्थापन केली, हे पूर्ण खोटे असल्याचे सिद्ध होते. कोरियातील फॉरेन्सिक लॅबमध्ये कोरियन लोकांच्या पुरातन सांगाड्यावर केलेल्या प्रयोगांच्या धर्तीवरच हडप्पातील लोकांच्या सांगाड्यांचा अभ्यास करून हे लोक कसे दिसत असावेत, याचे थ्रीडी चित्र काढले आहे. हा अभ्यास भारतीय, ब्रिटीश व अमेरिकन शास्त्रज्ञांनी केला. मूळचे हडप्पा संस्कृतीमधील लोक सध्याच्या हरयाणातील लोकांप्रमाणे उंच, गोरेपान, शरिरयष्टीने चांगले होते. इथे काही लोक दक्षिण भारत, महाराष्ट्रातून गेले असावेत. व्यापाराच्या निमित्ताने भारताबाहेरून काही लोक इथे आले असावेत. त्यांचाही अभ्यास करता येऊ शकतो, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
कसा बनला चेहरा?
हडप्पा संस्कृतीतील लोकांचा चेहरा तयार करण्यासाठी राखीगडी येथील कब्रस्थानमधील चांगल्या स्थितीतील सांगाडे घेतले. कवटीचा भाग घेऊन हाडांचे व्यवस्थित माप घेतले. मानेवरच्या सर्व भागाचे सिटी स्कॅन केले. मुखवटा बनवण्यासाठी कम्प्युटर प्रोग्राम तयार केला. हाडांवर स्थायू कसे असावेत याचाही अभ्यास केला. नंतर हाडांचे माप, सिटी स्कॅन व कम्प्युटर प्रोग्रामनुसार कवटीवर त्वचा बसविली. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीमधील लोकांचा थ्रीडी चेहरा समोर आला.