कवितेचे तीन दिवस...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 08:01 PM2018-04-17T20:01:32+5:302018-04-17T20:01:32+5:30
रॉय किणीकर, अरुण कोल्हटकर,आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यावरआधारित 'कवितेचे तीन दिवस...या काव्यरूपी महोत्सवाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
पुणे : गेली तीस वर्षे सातत्याने प्रथितयश कवींच्या काव्यावर आधारित कार्यक्रमांची श्रृंखला सादर करीत असलेली अनन्वय फौंडेशन असाच एक वेगळा कार्यक्रम घेऊन रसिकांसमोर येत आहे. दि. २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी रॉय किणीकर, अरुण कोल्हटकर,आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यावरआधारित 'कवितेचे तीन दिवस...या काव्यरूपी महोत्सवाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
फाऊंडेशनच्या काव्ययात्रेला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांपासून सुरूवात झाली. संत कवी ज्ञानेश्वर, बालकवी, माधव जूलियन, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, आरती प्रभु, रॉय किणीकर, विंदा करंदीकर आदी दिग्गजांची कविता 'अनन्वय'ने आपल्या व्यासपीठावरून मांडली. यामध्ये धनेश जोशी, डॉ.वृषाली पटवर्धन, ऋग्वेद सोमण काव्यवाचन करणार असून, मृण्मयी सिकनिस, राहुल घोरपडे काव्यगायन करणार आहेत. संहिता व संगीत दिग्दर्शन अनुक्रमे डॉ. माधवी वैद्य आणि राहुल घोरपडे यांचे आहे.
दुस-या दिवशी अरुण कोलटकरांच्या कवितेवर आधारित कार्यक्रम - 'जेजुरी आणि भिजकी वही' या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. जेजुरी वाचन डॉ. अजय जोशी तर 'भिजकी वही' चे वाचन धीरेश जोशी, अमृता कोल्हटकर, योगेश सोमण करतील. तिस-या दिवशी आरती प्रभू, जी.ए. आणि ग्रेस यांच्या प्रकृतीसाधर्म्यावर आधारित कार्यक्रम - 'सहोदर' हा कार्यक्रम रसिकांना ऐकता येईल. काव्यवाचन-निवेदन योगेश सोमण, डॉ. वृषाली पटवर्धन, धीरेश जोशी करणार असून, सौरभ दफ्तरदार, अमृता कोल्हटकर, राहुल घोरपडे काव्यगायन करतील. हे सर्व कार्यक्रम स्वा. सावरकर स्मारक सभागृह, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.