Pune Heavy Rain: पुण्यात शॉक लागून तिघांचा मृत्यू; तो अनधिकृत वीजपुरवठा, महावितरणचे स्पष्टीकरण
By नितीन चौधरी | Updated: July 26, 2024 18:11 IST2024-07-26T18:10:15+5:302024-07-26T18:11:49+5:30
अंडा भुर्जीच्या स्टॉलसाठी इतर ठिकाणाहून वायरद्वारे अनधिकृत वीजपुरवठा घेण्यात आला, त्या वीजप्रवाहामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज

Pune Heavy Rain: पुण्यात शॉक लागून तिघांचा मृत्यू; तो अनधिकृत वीजपुरवठा, महावितरणचे स्पष्टीकरण
पुणे : डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे गुरुवारी (दि. २५) पहाटे पाच वाजता अंडाभुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना विजेचा धक्का बसून तीन जणांचा मृत्यू झाला. या स्टॉलला वीजपुरवठा अनधिकृत होता. तर, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदी पात्राबाजूचा वीजपुरवठामहावितरणकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून पहाटे ४ च्या सुमारास बंद करण्यात आला होता, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. याबाबत महावितरणकडून विद्युत निरीक्षक कार्यालयास कळविण्यात आले असून, त्यांच्याद्वारे या घटनेचा स्वतंत्रपणे तपास करण्यात येत आहे.
याबाबत माहिती मिळताच महावितरणच्या कोथरूड विभागाचे कार्यकारी अभियंता विजय फुंदे व इतर अभियंते व कर्मचारी यांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मुख्य अभियंता राजेंद्र पवार व अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी देखील पाहणी केली. डेक्कन येथील नदी पात्राजवळील परिसरात महावितरणची यंत्रणा व वीजवाहिनी भूमिगत आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदी पात्राबाजूचा वीजपुरवठा महावितरणकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून पहाटे ४ च्या सुमारास बंद करण्यात आला होता. तथापि प्राथमिक पाहणीमध्ये तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अंडा भुर्जीच्या स्टॉलसाठी इतर ठिकाणाहून वायरद्वारे अनधिकृत वीजपुरवठा घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेताना या वायरमधील वीजप्रवाहामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सद्य!स्थितीत स्टॉलचा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे अपघातास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य नसल्याचे दिसून आले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर ही पाहणी करता येईल.