वाघोलीत तिघे बुडाले ; आई मुलाला वाचवण्यासाठी गेलेली व्यक्तीही बुडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 07:55 PM2020-01-21T19:55:06+5:302020-01-21T19:59:06+5:30
माय-लेकांचा मृतदेह शोधण्यासाठी बोट व ग्रामस्थांच्या मदतीने अग्निशमन प्रयत्न केले परंतु हाती काही लागले नाही. परंतु अद्यापही अग्निशामक दल लोणीकंद पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य काम चालूच आहे.
पुणे (वाघोली) : वाघोली-भावडी रस्त्याच्याकडेला असणाऱ्या भैरवनाथ तळ्यामध्ये माय-लेक व त्यांना वाचविण्यासाठी गेलेला एकजण असे तिघेजण बुडल्याची घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. तिघांपैकी वाचविण्यासाठी गेलेल्याचा मृतदेह मिळाला असून माय - लेकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दत्तात्रय रघुनाथ जाधव (वय ४०, रा. भैरवनाथ तळ्याशेजारी), रोहिणी संजय पाटोळे (वय ४०, रा. पाटोळे वस्ती), स्वप्नील संजय पाटोळे (वय १३, रा. पाटोळे वस्ती) असे तळ्यामध्ये बुडालेल्या तिघांची नावे आहेत. तिघांपैकी दत्तात्रय जाधव यांचा मृतदेह सापडला असून माय-लेकांचा मृतदेह काही मिळाला नाही.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी पाटोळे या मुलगा स्वप्नील व मुलगी साक्षीसह भैरवनाथ तळ्यामध्ये गोधड्या धुण्यासाठी आले होते. अल्फा होम्स सोसायटीच्या बाजूकडील पिचिंगवर गोधड्या धुण्याचे काम चालू असताना स्वप्नील हा पाण्यामध्ये पाय घसरून बुडत होता. त्याला वाचविण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली. दोघेही बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी भैरवनाथ मंदिराच्या बाजूने दत्ता जाधव यांनी तळ्यामध्ये उडी मारली. दोघांना वाचविण्यासाठी जात असताना जाधव दम लागून तळ्यामध्ये बुडाले तसेच माय-लेक देखील तळ्यामध्ये बुडाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सदरचा प्रकार ग्रामस्थांना सांगितल्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाला बोलविण्यात आले.
पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी गळाच्या सहाय्याने तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर साडे चार वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय जाधव यांचा मृतदेह मिळाला. माय-लेकांचा मृतदेह शोधण्यासाठी बोट व ग्रामस्थांच्या मदतीने अग्निशमन प्रयत्न केले परंतु हाती काही लागले नाही. परंतु अद्यापही अग्निशामक दल लोणीकंद पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य काम चालूच आहे.