पुणे पालिकेच्या दवाखान्याचे तीन मजले आयपीडीच्या प्रतीक्षेत पडले धूळ खात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 01:16 PM2019-07-23T13:16:56+5:302019-07-23T13:19:19+5:30
या चारमजली महापालिकेच्या दवाखान्याचे उद्घाटन २८ मार्च २०१६ रोजी करण्यात आले.
कल्याणराव आवताडे-
पुणे : वडगाव खुर्द येथे राजयोग सोसायटी परिसरात कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे या नावाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने तीन वर्षांपूर्वीच चारमजली दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र उद्घाटन होऊन तीन वर्षे झाली तरी या दवाखान्यात फक्त बाहयरुग्ण (ओ.पी.डी) विभागच सुरू असून, अद्यापपर्यंत या ठिकाणी आंतररुग्ण विभाग (आय. पी. डी.) सुरु करण्यात आलेला नसल्यामुळे परिसरातील रुग्णांना नाइलाजास्तव खासगी दवाखान्यात जावे लागत आहे.
या चारमजली महापालिकेच्या दवाखान्याचे उद्घाटन २८ मार्च २०१६ रोजी करण्यात आले. परंतु सध्या येथे फक्त ओपीडीच चालू असल्याने रुग्णांना अॅडमिट करता येत नाही. सध्या पहिल्या मजल्यावर असलेल्या या बाह्यरुग्ण विभागात एक एमबीबीएस डॉक्टर, एक फार्मसी, एक नर्सिंग ऑर्डरली, एक सुरक्षारक्षक असा मिळून चार लोकांचा स्टाफ आहे. परंतु याच इमारतीच्या दुसºया व तिसºया मजल्यावर आंतररुग्ण विभाग करण्याचे योजिले होते. चौथ्या मजल्यावर स्टाफला राहण्यासाठी सोय करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आत्तापर्यंत या ठिकाणी हा विभाग सुरु न झाल्याचे दिसून येते. बरीच कामे अपूर्ण असल्याने हे वरील तीनही मजले रिकामे असल्याने धूळ खात पडले आहे.
मुळात ह्या परिसरात मध्यमवर्गीय लोकवस्ती जास्त असल्याने महापालिकेच्या दवाखान्यात येणाºया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एवढ्या मोठ्या इमारतीत सर्व सोयीसुविधायुक्त आंतररुग्ण विभाग नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येस तोंड द्यावे लागत आहे.
सध्या महापालिकेच्या या दवाखान्यात रोज पन्नासच्या आसपास रुग्ण येतात; मात्र ओपीडी विभागात त्यांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. मात्र अॅडमिट करण्यासाठी खासगी दवाखान्यात जावे लागत आहे.
..........
या महानगरपालिकेच्या दवाखान्यात परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरु असून, अत्याधुनिक पद्धतीचा आंतररुग्ण विभाग लवकरात लवकर सुरू करावा, यासाठी संबंधित महापालिकेच्या अधिकाºयांना सूचना दिल्या असून, लवकरच सर्वसोयींयुक्त महापालिकेचा दवाखाना नागरिकांच्या सेवेस असेल. - राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक
...........
सदर महापालिकेच्या दवाखान्यात दुसऱ्या मजल्यावर प्रसूती गृह (मॅटर्निटी होम) सुरू करावयाचे असून, याकरिता लागणारे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी वर्ग यांची कंत्राटी पद्धतीवर भरती प्रक्रिया सुरू असून, तसेच सोनोग्राफी व इतर सर्व सुविधा येथे सुरु करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत सर्व सोयीसुविधायुक्त आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात येईल.- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य विभागप्रमुख, पुणे मनपा
...........
सध्या फक्त बाह्यरुग्ण विभाग सुरु असून, महापालिकेच्या नियमानुसार दोन दिवसांच्या औषधांसाठी पाच रुपये, तर चार दिवसांच्या औषधांसाठी दहा रुपये केसपेपर फी म्हणून घेतली जात असून, याचा लाभ परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या सर्वच वर्गातील नागरिकांना होत आहे. - डॉ. शुभांगी शाह, वैद्यकीय अधिकारी, कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखाना
कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे या महापालिकेच्या दवाखान्यात सध्या फक्त ओपीडी विभाग सुरु आहे. मात्र पेशंट दाखल करावयाचा असेल तर खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने महापालिकेने ह्याच दवाखान्यात त्वरित आंतररुग्ण विभाग सुरू करावा. - हरिश्चंद्र दांगट, माजी नगरसेवक