कौतुकास्पद! दोन हातांच्या जोरावर जलतरणात तीन सुवर्णपदके, तृप्ती चोरडियाची कामगिरी
By श्रीकिशन काळे | Published: October 12, 2023 02:35 PM2023-10-12T14:35:34+5:302023-10-12T14:37:09+5:30
राज्यस्तरीय पॅरा स्वीमिंग चॅम्पियनशीप...
पुणे : तिचे ९० टक्के अपंगत्व असले तरी देखील जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर तिने जलतरणात प्रावीण्य मिळवले आणि आज ती अनेक जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्णपदकांची मानकरी ठरत आहे. नुकतेच डोंबिवली येथे १५ वी राज्यस्तरीय पॅरा स्वीमिंग चॅम्पियनशीप झाली. त्यात तिने विविध गटामध्ये तीन सुवर्णपदके पटकाविली. तिचे नाव तृप्ती दिलीप चोरडिया.
लहानपणी तिला अपंगत्व आले, त्यानंतर चौथ्या वर्षापासून तिने पोहण्याचा सराव सुरू केला. आज ती ३४ वर्षांची असून, ती ३० वर्षांपासून पोहत आहेत. पायांमध्ये काहीही संवेदना नसल्यामुळे तिला दोन्ही हातांवरच पाण्यात पोहावे लागते. सुरवातीला तिला शिकायला खूप कष्ट करावे लागले. त्यानंतर ती त्यामध्ये अतिशय प्रवीण झाली. त्यानंतर हळूहळू तिने पॅरा स्वीमिंगमध्ये सहभागी होणे सुरू केले. आतापर्यंत तिने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. राज्यस्तरीय स्तरावर तिने अनेक सुवर्णपदके मिळविली आहेत. ती ग्राफिक डिझायर असून, तिला शेअर मार्केटचे देखील ज्ञान आहे. या कामासाठी तिचे वडिल दिलीप आणि भाऊ सूरजने खूप मदत केली. भावासोबत ऑनलाइन शेअर मार्केट शिकल्यानंतर ‘डिझाईन डेस्टिनेशन’ या नावाने कंपनी स्थापन केली. ती म्हणते, वडिल, आई सरोज, विद्या निकेतन शाळेचे सुभाष आणि सुभाषिता शेट्ये यांनी खूप साथ दिली.
भारतासाठी जिंकायचेय सुवर्णपदक
सहकारनगरमधील एका जलतरण तलावात ती पोहत असताना तिची घनश्याम मारणे यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी तिला स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे सुचविले. तिने स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर अनेक सुवर्णपदके पटकाविली. तिला आंतरराष्ट्रीय पॅरा स्वीमिंगमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. त्यासाठी सध्या ती घोरपडे पेठ येथील कै. निळूभाऊ फुले जलतरण तलावात सराव करत आहे. नुकतीच डोंबिवलीमध्ये १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये, शंभर मीटर बॅक स्ट्रोकमध्ये आणि शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. तिला स्वीमिंग कोच हर्षद इनामदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.