दोन लाखांची खंडणी घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ३ गुंडांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 04:16 PM2021-10-07T16:16:02+5:302021-10-07T16:16:14+5:30
टोळीचा जम बसविण्यासाठी व्यापाऱ्याला मागत होते खंडणी, सापळा रचून पकडले
पुणे : आपल्या टोळीचा पुण्यात जम बसविण्यासाठी टिंबर मार्केटमधील व्यापार्याला २ लाख रुपयांची खंडणी मागून ती घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या तिघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले.
विशाल ऊर्फ जंगल्या शाम सातपुते (वय ३२, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ), मंगेश शाम सातपुते (वय ३६) आणि अक्षय दत्तात्रय भालेराव (वय २६, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका ४६ वर्षाच्या व्यापार्याने येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विशाल ऊर्फ जंगल्या सातपुते हा गेल्या काही दिवसांपासून फिर्यादी यांना सतत फोन करुन मी पुण्यातील भाई असून माझी पुण्यामध्ये टोळी आहे. मला माझ्या टोळीचा पुणे शहरात जम बसवायचा आहे, तू मला ओळखत नाही का. तुला टिंबर मार्केटमध्ये धंदा करावयाचा असेल तर मला २ लाख रुपये दे. जर पैसे दिले नाही तर तुला संपवून टाकेन, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी करीत होता. या व्यापाऱ्याने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी यांना पैसे घेण्यासाठी बोलविण्यास सांगितले. त्यानुसार पैसे घेण्यासाठी या गुंडांना विमाननगर येथील हॉटेल हयात रिजेन्सी येथे बुधवारी सायंकाळी बोलविण्यात आले. पोलिसांनी सापळा रचला होता. फिर्यादीकडून या गुडांनी १ लाख रुपये स्वीकारली असताना पोलिसांनी त्या तिघांना रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
विशाल श्याम सातपुते याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी असे विविध ४ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. विशाल सातपुते व त्याच्या टोळीतील ६ जण अशा ७ जणांना पुणे पोलिसांनी गुन्हा वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले होते. त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे आणि कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.