नवनगर प्राधिकरण उभारणार तीन गृहप्रकल्प

By admin | Published: January 8, 2016 01:37 AM2016-01-08T01:37:09+5:302016-01-08T01:37:09+5:30

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ३०२ कोटी ७३ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

Three Home Projects to be set up by Nawanagar Authority | नवनगर प्राधिकरण उभारणार तीन गृहप्रकल्प

नवनगर प्राधिकरण उभारणार तीन गृहप्रकल्प

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ३०२ कोटी ७३ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. गृहनिर्माणाला या अर्थसंकल्पात प्राधान्य दिले आहे. सेक्टर ३० मधील वाल्हेकरवाडी, चिंचवड आणि भोसरी सेक्टर १२ मध्ये आठ हजार आठशे सदनिकांचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील ओपन प्रदर्शन केंद्राच्या कामाच्या खर्चासही मान्यता दिली आहे.
आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या प्रशासकीय इमारतीत प्राधिकरणाची अर्थसंकल्पीय सभा गुरुवारी झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांनी अध्यक्ष चोक्कलिंगम यांना अर्थसंकल्प सादर केला. या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी रमेश कुलगोड, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, स्रेहल भोसले, महापालिका आयुक्त राजीव जाधव, शहर अभियंता महावीर कांबळे उपस्थित होते. चर्चेनंतर अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. २०१६-१७ चा अर्थसंकल्प ३०२ कोटी ७३ लाख २५ हजारांचा प्रस्तावित केला आहे. त्यात ३०२ कोटी ३९ लाख ३० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ३३ लाख ९५ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे.
जमा विभागात आरंभीची शिल्लक २३५.५६ कोटी असून, महसुली जमा ३८.५७ कोटी आहे. त्यात ठेवीवरील व्याज ३२ कोटी आणि दंडाची रक्कम पाच कोटी आहे. तसेच भांडवली जमा २८.५९ कोटी असून, भूखंड विक्रीतून १० कोेटी, हस्तांतरण शुल्कातून १० कोेटी, निधी व व्याज विकास निधीतून ५.९६ कोटी, ठेकेदारांच्या ठेवी अशी २.३ कोटी नमूद केले आहेत. एकूण जमा रक्कम ६७ कोटी १६ लाख एवढी आहे.
तसेच खर्च विभागात महसुली खर्च ४३.५६ कोटींपैकी कर्मचारी आस्थापना १४.८५ कोटी, आकस्मिक खर्च २३. ७१ कोटी रुपये दर्शविला आहे. तसेच भांडवली खर्चात २५८.८३ कोटी रुपये दर्शविला असून, विविध विकासकामांसाठी १०९.५० कोटी, उद्यान, पर्यावरण, सुधारणा आणि शहरी वनीकरणासाठी ३१.२३ कोटी, भूसंपादनासाठी २० कोटी, अभियांत्रिकी कामासाठी ११ कोटी, इतर बांधकामे यासाठी ८९.०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.

Web Title: Three Home Projects to be set up by Nawanagar Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.