खेड तालुक्यात बिबट्याचा तीन तास धुमाकुळ... ग्रामस्थांनी काढली रात्र जागून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 05:13 PM2019-02-23T17:13:55+5:302019-02-23T17:19:46+5:30
ठाकरवाडी येथे सुभद्रा शिंदे या रात्री घराबाहेरील अंगणात झोपल्या होत्या. अंगणासमोरच ४ शेळ्या बांधल्या होत्या.
खेड (दावडी) : रेटवडी ता खेड येथील ठाकरवाडीत बिबट्याने तीन तास धुमाकूळ घातला. बिबट्याने एका शेळी वरती हल्ला जखमी केले, मात्र, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे यांनी प्रसंग सावधान दाखवून बिबट्याचा हल्ला परतून लावला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन वनखात्याने या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरवाडी येथे सुभद्रा शिंदे या रात्री घराबाहेरील अंगणात झोपल्या होत्या. अंगणासमोरच ४ शेळ्या बांधल्या होत्या. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने शेळीवरती झडप घातली. दरम्यान, शिंदे यांना आवाजाने जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,बिबट्याने शेळीचे मानगूट पकडण्याच प्रयत्न करत होता. मात्र शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवून अंगावर पांघरण्यासाठी घेतलेले ब्लँकेट बिबट्याच्या अंगावर टाकले. व ब्लँकेटने बिबट्याला मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, बिबट्याचा एक पाय ब्लँकेटमध्ये अडकला आणि बिबट्याने धूम ठोकली.त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने बिबट्या ठाकरवाडी येथील रस्त्यामधेच ठाण मांडून बसला. शिंदे यांनी जवळपासच्या ग्रामस्थांना बोलविले. मात्र, बिबट्या जागेवरुन हलणयास तयार नव्हता. ग्रामस्थही हतबल झाले आणि सुमारे तीन तास हा बिबट्या या परिसरातच फिरत होता .त्यामुळे ग्रामस्थांनी अख्खी रात्र जागून काढली. परंतु बिबट्याच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांकडून वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.