चांदूस-कोरेगाव रस्त्याचे तीन तेरा
By admin | Published: May 1, 2017 02:10 AM2017-05-01T02:10:25+5:302017-05-01T02:10:25+5:30
विमानतळ होणार म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या आणि जमिनीला लाख मोलाचा भाव आलेल्या चांदूस-कोरेगाव या
आंबेठाण : विमानतळ होणार म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या आणि जमिनीला लाख मोलाचा भाव आलेल्या चांदूस-कोरेगाव या गावांना जोडणा-या रस्त्याची अवस्था आता मात्र अतिशय दयनीय झाली आहे. एरवी विमानतळ येणार म्हणून चर्चेत असणारी हीच गावे आता खराब रस्त्यांची गावे म्हणून ओळखू लागली आहेत. काही ठिकाणी पडलेले फुटभर खोल खड्डे, रस्त्याच्या तुटलेल्या कडा आणि विस्तारलेली खडी असेच या रस्त्याचे वर्णन करावे लागेल.
याशिवाय अनेक वेळा मोठ्या गाड्यांच्या टायरने अशी वर आलेली खडी जोरात उडते आणि मग त्यामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक, रस्त्याने प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि पायी प्रवास करणा-या नागरिकांना विनाकारण अशी खडी लागून त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
याशिवाय येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तर या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असून त्यामुळे अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहे. अनेक वेळा या खड्ड्याचा अंदाज न आल्याने या खड्ड्यात वाहने पडून अपघात झाले आहे. त्यामुळे पुन्हा अशी अपघाताची घटना घडू नये म्हणून आजूबाजूच्या नागरिकांनी तर या खड्ड्यात मोठाले दगड टाकले असून त्यावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत जेणेकरून हा खड्डा लोकांना समजावा. अशी भयानक अवस्था या रस्त्याची झाली आहे.
या रस्त्याचा प्रमुख वापर हा शालेय विद्यार्थी आणि शेतकरी वगार्ला होत आहे.
तालुक्याच्या गावाला जोडणारा हा रस्ता असल्याने अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे. दुचाकी वाहने तर या रस्त्याने प्रवास करून पार खिळखिळी झाली असून दररोज प्रवास करणा?्या नागरिकांचे तर या रस्त्याने प्रवास करून कंबरडे मोडण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चांदूस ते कोरेगाव बुद्रुक या अंतरापैकी चांदूस येथील हायस्कूल ते कोरेगाव या अंतरामधील रस्ता काही प्रमाणात बरा असून त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे बुजवावे, अशी माफक अपेक्षा प्रवाशांकडून केली जात आहे.
केवळ म्हणायला आणि कागदोपत्री डांबरी असणारा हा रास्ता सध्या मात्र धुळीचा आणि प्रवासी नागरिकांच्या जीवावर उठलेला रस्ता ठरत आहे.
काही ठिकाणी तर रस्त्यावर ५-५ फुट व्यासाचे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचून रस्त्यावर डबके साचल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. (वार्ताहर)
रस्ता अपुरा : कडा तुटल्याने धोका
चांदूस-कोरेगाव बुद्रुक हा जवळपास चार किलोमीटर लांबीचा रस्ता असून राजगुरुनगर या तालुक्याच्या गावाला जोडणा-या अनेक महत्वाच्या रस्त्यांपैकी हा महत्वाचा रस्ता आहे. परंतु सध्या डांबरी रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. त्या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्य म्हणावे लागेल. रस्त्याच्या कडा तुटत चालल्याने रस्ता रुंदीचा विचार केला तर तो निम्म्यावर आला असल्याने रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत आहे.
पाईट रोडपासून चांदूस या गावाकडे येताना येथील हायस्कूलपर्यंत येणारा रस्ता हा आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण होतो.
कारण या जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर पावलोपावली असणारे ३-३ फुट व्यासाचे खड्डे, आणि त्यामधून खडी निघाली आहे. अशी निघालेली खडी रस्त्यावर विखुरली आहे.
त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास केल्यासारखे आहे. कारण अनेक वेळा या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होत असून त्यामुळे अनेकांना लहान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे.