महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना कात्री लावत तीनशे कोटींचे वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:50+5:302021-03-19T04:10:50+5:30

पुणे : ‘एचसीएमटीआर’, ‘बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण’, ‘पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसखरेदी’, ‘कोथरूड येथे शिवसृष्टी उभारणे’आदी महत्वाकांक्षी प्रकल्पांना कात्री लावत, गुरुवारी सदर ...

Three hundred crore classification of ambitious projects | महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना कात्री लावत तीनशे कोटींचे वर्गीकरण

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना कात्री लावत तीनशे कोटींचे वर्गीकरण

googlenewsNext

पुणे : ‘एचसीएमटीआर’, ‘बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण’, ‘पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसखरेदी’, ‘कोथरूड येथे शिवसृष्टी उभारणे’आदी महत्वाकांक्षी प्रकल्पांना कात्री लावत, गुरुवारी सदर कामांसाठी तरतूद केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी अन्य कामांसाठी वळविला. सुमारे तीनशे कोटी रुपयांचा हा निधी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुचविलेल्या वॉर्डस्तरीय विकासकामांना देऊन, मार्च-एण्डपूर्वी नगरसेवकांना सत्ताधारी पक्षाने खूष केले आहे़

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नगरसेवकास आपल्या प्रभागात संकल्पित कामे पूर्ण करावयाची असल्याने, अनेकांनी ‘स’ यादीतून स्थायी समितीकडे वॉर्डस्तरीय कामांची यादी सादर केली होती़ या यादीला अनुसरून काही दिवसांपूर्वीच स्थायी समितीने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना २ कोटी रुपये तर विरोधी पक्षातील नगरसेवकांना १ कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणातून उपलब्ध करून दिला होता़ आज हा वर्गीकरणाचा विषय महापालिकेच्या आॅनलाईन सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आला असता, एका पाठापोठ एक सर्वच वर्गीकरणाचे विषय विनाहरकत सर्वपक्षीय नगरसेवकांना मान्य केले़ यात प्रभागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, विरंगुळा केंद्र बांधणे, कॉंक्रिटीकरण करणे, उद्यानाची कामे पूर्ण करणे, ड्रेनेज लाईन टाकणे आदी शेकडो कामांचा समावेश होता़

एक-दोन लाखांपासून सत्तर ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी, मात्र सत्ताधारी पक्षाने आपल्या बजेटमधील महत्वाकांक्षी प्रकल्पांना कात्री लावली़ यात ‘एचसीएमटीआर’ करिता तरतूद केलेले ११० कोटी रूपये, ‘कोथरूड येथे शिवसृष्टी उभारणे’ या कामासाठी तरतूद केलेले २३ कोटी रूपये, ‘बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण’ करिताचे ९ कोटी ७० लाख रुपये, ‘पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस खरेदी’ करिताचे ६४ कोटी रुपये यांचा समावेश आहे़

--------------------------

तरतूद केली, पण कामे पूर्ण करण्याचे आव्हान

सर्वपक्षीय नगरसेवकांना सत्ताधारी पक्षाने आज कोट्यवधी रुपये वर्गीकरणातून वॉर्डस्तरीय कामांकरिता उपलब्ध करून दिले आहेत़ मात्र, या मार्चपूर्वी ही कामे होणे अशक्यप्राय असल्याचे बोलले जात आहे़ त्यामुळे या तरतुदी पुढील वर्षीच्या बजेटमधून लॉकिंगच्या माध्यमातून केली जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शहरातील माननीयांना आपल्या कामांचा श्रीगणेशा तसेच उद्घाटन कार्यक्रम घेता येण्याची शक्यता आहे़

Web Title: Three hundred crore classification of ambitious projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.