हडपसरमध्ये तीनशे झोपड्या जमीनदोस्त; पाटबंधारे विभागासोबत पालिकेची संयुक्त कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 12:54 PM2021-10-30T12:54:58+5:302021-10-30T13:00:31+5:30
या कारवाईत पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी सहभागी झाले होते. पाच जेसीबीसह दहा डंपरद्वारे ही कारवाई झाली. सुमारे एक किलोमीटर अंतरात सलग पत्र्याची शेड मारून ही अतिक्रमणे केली होती
हडपसर : येथील औद्योगिक वसाहती मागील मुठा कालव्यालगत दोन्हीही बाजूने झालेल्या अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेने संयुक्तपणे कारवाई केली. दिवसभर चाललेल्या या कारवाईत सुमारे तीनशे झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. येथील पाटबंधारे विभागाच्या मोठ्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमणे झालेली होती. चार वर्षांपूर्वी केलेल्या एका कारवाईत अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्यानंतर औद्योगिक वसाहतीमागील बाजूस पुन्हा नव्याने अतिक्रमणे झाली होती. ती दीड महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईत काढून टाकण्यात आली होती. मात्र, पुन्हा नव्याने पन्नास ते साठ पत्र्याची शेड ठोकून अतिक्रमणे करण्यात आली होती.
या कारवाईत पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी सहभागी झाले होते. पाच जेसीबीसह दहा डंपरद्वारे ही कारवाई झाली. सुमारे एक किलोमीटर अंतरात सलग पत्र्याची शेड मारून ही अतिक्रमणे केली होती. अतिक्रमणे हटविल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी तारेचे कुंपन ओढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत हडपसर परिसरात मोठ्याप्रमाणात पाटबंधारे विभागाची जमीन आहे. त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. ती काढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. पुढील काळात टप्याटप्याने सर्व अतिक्रमणे काढून जागा मोकळ्या करण्यात येणार आहेत