क्रेडिट कार्डची माहिती चोरून पैसे लंपास केल्याच्या तीन घटना
By Admin | Published: January 31, 2015 01:11 AM2015-01-31T01:11:32+5:302015-01-31T01:11:32+5:30
क्रेडिट कार्डची माहिती चोरून आॅनलाईन पैसे चोरल्याच्या तीन घटना शहरात घडल्या आहेत. या तीन घटनांमध्ये मिळून चोरट्यांनी तीन लाख ११ हजार रुपयांची रक्कम लंपास केली.
पुणे : क्रेडिट कार्डची माहिती चोरून आॅनलाईन पैसे चोरल्याच्या तीन घटना शहरात घडल्या आहेत. या तीन घटनांमध्ये मिळून चोरट्यांनी तीन लाख ११ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. या प्रकरणी सिंहगड रस्ता, डेक्कन आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्यवान सावंत (वय ३८, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सावंत यांना अज्ञाताने ई-मेल पाठविला. बँकेच्या माहितीचा वापर करून दोन लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच, स्टेट बँक आॅफ इंडियाकडूनही नाव, खाते क्रमांक यांची पडताळणी न करता आर्थिक व्यवहार करण्यात आले.
डेक्कन पोलीस ठाण्यात अमरेशचंद्र गोस्वामी (वय ६१, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. गोस्वामी यांच्या सुनेचे बँक आॅफ इंडियाच्या कर्वे रस्ता शाखेमध्ये खाते आहे. आरोपीने गोस्वामी यांच्या सुनेच्या नावे असलेल्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे बनावट क्रेडिट कार्ड तयार केले. आॅनलाईन वापर करून दिल्ली येथे आर्थिक व्यवहार करून गोस्वामी आणि त्यांच्या सुनेच्या संयुक्त खात्यातील ९१ हजार ३९५ रुपयांच्या रकमेचा अपहार केला.
निगडी येथे राहणाऱ्या स्नेहल लोखंडे (वय २९) या घरी
एकट्या असताना त्यांना नेहा गुप्ता नावाच्या तरुणीचा बुधवारी दूरध्वनी आला. व्हिसा व्हेरिफिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे तिने सांगितले.
क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवून विचारलेल्या माहितीद्वारे २० हजार २६४ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)