Pune | येरवडा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू; कारागृहाच्या आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:46 AM2023-01-03T08:46:39+5:302023-01-03T08:50:13+5:30
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद...
पुणे :येरवडा मध्यवर्ती कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू झाल्या आहे. तिन्ही कैद्यांचे मृत्यू हे वेगवेगळ्या आजारपणातून झाल्याचे कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी येरवडापोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, येरवडा कारागृहाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेबाबत सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. संदेश अनिल गोंडेकर (वय २६, रा. डोणजे, हवेली), शाहरूख बाबू शेख (वय २९, रा. कोंढवा), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय ३२, रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत.
गोंडेकर यास २०१८ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, तेव्हापासून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमितपणे जात होते. ३१ डिसेंबरला त्याचे वडील त्यास भेटण्यासाठी कारागृहात गेले होते. त्यावेळी त्यांना हवेली पोलिस ठाण्यामार्फत त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मृत्यूस कारागृह प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत आक्षेप नोंदविला. त्यानंतर येरवडा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू लिव्हर सोरायसिसमुळे झाल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, शाहरूख शेख व रंगनाथ दाताळ या दोन्ही कैद्यांनादेखील विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबत येरवडा कारागृह प्रशासनाच्या वतीने संबंधितांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यांमार्फत कळविले आहे. दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तिन्ही कैद्यांना विविध प्रकारचे आजार होते, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे. एका कैद्याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूबाबत शंका होती, त्याबाबत डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मृत्यूचे कारण सांगण्यात आले आहे.
- बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे