अपघातात तिघे ठार
By admin | Published: October 7, 2015 04:03 AM2015-10-07T04:03:51+5:302015-10-07T04:03:51+5:30
केडगाव ता. (दौंड) येथे चौफुला रस्त्यावर अशोक लेलँड व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीघेजण ठार झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने सदरचा ट्रक
केडगाव : केडगाव ता. (दौंड) येथे चौफुला रस्त्यावर अशोक लेलँड व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीघेजण ठार झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने सदरचा ट्रक पेटवून दिला. ही घटना आज मंगळवारी (दिनांक ६) रात्री साडे आठच्या दरम्यान घडली.
या घटनेत बोरीपार्धी येथील संतोष विष्णू नेवसे (वय ३४), सुभाष अर्जुन नेवसे (वय ४२), हे जागीच ठार झाले. तर श्रीरंग मारुती नेवसे (वय ४४) हे दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तिघेही युवक विवाहीत होते.
हे तिघेजण केडगाववरून चौफुल्याकडे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने ट्रकने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, तिघेजण रस्त्यावरून दूर फेकले गेले. दुचाकीचीही दुरवस्था झाली होती.
मयतांच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार लागला होता. घटनेनंतर परिसरातील जमाव तेथे जमा झाला. त्यांनी ट्रक रॉकेलच्या साह्याने पेटवून दिला. सुमारे पाऊण तासानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
केडगाव चौफुला रस्त्यावर असणाऱ्या अरुंद पुलाशेजारी ही घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या दोन वषार्तील या पुलाजवळील ही तिसरी घटना आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. तिघांना शवविच्छेदनासाठी यवत येथे नेले होते.
केडगाव चौफुला रस्त्यावर अरुंद पुलावर यापूर्वी अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे शिरुर- सातारा या राज्यमार्गावर हा रस्ता असुनही ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य आहे. यामुळेच सदरचा अपघात घडला असावा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला.