दरोडेखारांच्या मारहाणीत तीन ठार
By Admin | Published: April 26, 2017 04:25 AM2017-04-26T04:25:47+5:302017-04-26T04:25:47+5:30
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणे गाव येथील शेतातील घरावर मंगळवारी पहाटे
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणे गाव येथील शेतातील घरावर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. सोमाटणे फाट्यापासून काही अंतरावर धामणी गाव आहे. तेथून एक किलोमीटर अंतरावर फाले कुटुंबीयांचे घर आहे. या घरात चार दरोडेखोर शिरले. त्यांनी फाले कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. टिकावाचे घाव डोक्यात घालून त्यांनी फाले कुटुंबीयांतील तिघांना ठार केले. त्यात एका महिल्ोचाही समावेश आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला आणि सहा वर्षांची बालिका जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नथू विठोबा फाले (वय ६५), छबाबाई नथू फाले (वय ६०) हे दाम्पत्य आणि मुलगा अत्रिनंदन ऊर्फ आबा नथू फाले (वय ३०) अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेत नथू फाले यांची सून तेजश्री अत्रिनंदन फाले (वय २५) गंभीर जखमी झाली आहे. अंजली अत्रिनंदन फाले ही सहा वर्षांची नात किरकोळ जखमी आहे.
मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळील धामणे या गावात मंगळवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली. फाले यांच्या कुटुंबात एकूण सात जण होते. दरोडेखोरांनी फाले यांच्या घराचा पुढील लाकडी दरवाजा तोडून तसेच मागील खिडकी उचकटून घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्यांच्या डोक्यात टिकावाचे घाव घातले. घरात रक्ताचा सडा पसरला. सून तेजश्री यांनाही डोक्यात मार लागला. त्या बेशुद्ध होऊन पडल्या. फाले कुटुंबीयांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून हल्लेखोर पळून गेले. शुद्धीवर आल्यानंतर सून तेजश्री यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे आणि गावातील लोक त्या ठिकाणी आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
फाले कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी दरोडेखोरांनी त्याच परिसरातील प्रल्हाद तुकाराम गराडे, गौरव बाळू गराडे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटण्याचा प्रयत्न केला होता. हल्ला करणारे आठ दरोडेखोर असल्याचा अंदाज तेथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या.