पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 08:58 AM2024-10-02T08:58:08+5:302024-10-02T09:15:23+5:30

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Three killed in helicopter crash in Pune Bawdhan area | पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण

Pune Helicopter Crash : पु्ण्यात पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या अपघाताची घटना समोर आली आहे.  पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमला या घटनेची माहिती मिळाली. एका रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला.

पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास धुके असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते आणि तिघांचाही मृत्यू झाला. या परिसरात एकमेक हेलिपॅड असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती तिथे येत असतात. घटनेची माहिती पोलिसांसह, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.

ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल नावाच्या केंद्र सरकारच्या संस्थेच्या मधल्या डोंगराळ भागातील के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर काही अंतरावरच हेलिकॉप्टरचा अपघात झाला, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. 

अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे तिन्ही मृतदेह गंभीररित्या जळाले. हेलिकॉप्टर सरकारी की खासगी हे अद्याप समजू शकलेले नाही. मृतांचीही ओळख पटू शकली नाही.

दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची ४० दिवसातील पुण्यातील दुसरी घटना आहे. याआधी २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी होते. या अपघातात पायलट जखमी झाला. उर्वरित तीन जणांना गंभीर दुखापत झाली नाही.

Web Title: Three killed in helicopter crash in Pune Bawdhan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.