वडगाव कांदळीत तीन लाखांची केबल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:50+5:302021-05-05T04:18:50+5:30
कुकडी नदीवरील बरेचसे विद्युतपंप पाण्याअभावी बंद आहेत. नदीपात्रात पाणी नसल्याने किंवा शेतकऱ्यांची वर्दळ नसल्याने चोरट्यांनी या केबल चोरून नेल्याचे ...
कुकडी नदीवरील बरेचसे विद्युतपंप पाण्याअभावी बंद आहेत. नदीपात्रात पाणी नसल्याने किंवा शेतकऱ्यांची वर्दळ नसल्याने चोरट्यांनी या केबल चोरून नेल्याचे बोलले जात आहे. केबीन बॉक्स ते विद्युत पंप अशा एका शेतकऱ्याच्या ३०० ते ६०० फूट अंतराच्या कॉपरच्या केबल असतात. ही कॉपरची केबल खरेदी करण्यासाठी एका शेतकऱ्याला दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. चोरट्यांनी या केबल काही अंतरावर जाऊन केबलचे बाहेरचे प्लास्टिकचे आवरण काढून टाकून आतील कॉपर काढून नेले आहे.
----
नित्याचीच केबल चोरी
कुकडी नदीवरील केबल चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. नदीपात्रातील पाणी कमी झाले की, दरवर्षी दहा ते पंधरा लोकांच्या विद्युत मोटारीची केबल चोरी होत असते. सुरुवातीला शेतकरी हा भुर्दंड सहन करून पोलिसांत तक्रार करत नव्हते. परंतु हा प्रकार दिवसेंदिवस वाढत गेल्याने शेतकरीही पोलिसांत तक्रार दाखल करत आहेत.
* * * * * * * * * * * * * * * * * *
शेतकऱ्यांचे थेट गृहमंत्र्यांना साकडे
मागील आठवड्यात अशाच प्रकारे जुन्नर तालुक्यात येडगाव धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत् पंपांच्या लाखो रुपयांच्या केबल चोरी गेल्या होत्या. या विभागाचे एकेकाळी विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडेच शेतकऱ्यांनी या चोरीचा विषय कानावर घालून या चोरीच्या तपासाची मागणी केली आहे. यामुळे या परिसरातील केबल चोरांना शोधणे हे नारायणगाव पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक भीमा लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गारगोटे तपास करीत आहेत.
वडगाव कांदळी येथील नदीपात्रातून सोमवारी रात्री २४ जणांच्या विद्युत मोटारीच्या केबलची चोरी झाली आहे. पाटबंधारे विभागाने नदीला त्वरित पाणी सोडावे, ज्यामुळे केबल पाण्यात असल्यास चोरी होत नाही. या केबल चोरांचा पोलिसांनी ताबडतोब शोध घेणे गरजेचे आहे.
सचिन निलख
सदस्य, ग्रामपंचायत वडगाव कांदळी
वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीवरील शेतकर्यांच्या चोरी गेलेल्या केबलचा पंचनामा करताना पोलीस कर्मचारी.