लोणी काळभोर येथे चोरट्यांकडून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:38 PM2018-05-30T18:38:12+5:302018-05-30T18:38:12+5:30
अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोणी काळभोर : शिंदवणे येथील लोकवस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने व २ लाख ५६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख २२ हजार किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. ३०मे) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याचोरीप्रकरणी ज्ञानोबा कुंडलिक महाडीक (वय ५२, रा. वाकवस्ती, शिंदवणे, ता.हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडीक हे पीएमपीएमएल मध्ये बसचालक म्हणून काम करतात. याबरोबर ते मुलांसमवेत आपली शेतीही पाहतात. बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ज्ञानोबा महाडीक यांना जाग आली. ते्व्हा त्यांची खोलीसह सर्वच ठिकाणची दारे बंद दिसली. त्यांच्या वडिलांनी दरवाजा उघडल्यावर बाहेर येवून पाहिल्यावर घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच बेडरुममधील कपाटातून ३ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २ लाख ५६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख २२हजार रुपये किमती ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. महाडिक यांनी त्यानंतर ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जाऊन चोरीची तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले हे पुढील तपास करीत आहे.