ऊसतोड सुरू असतानाच आढळले बिबट्याचे तीन बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:12 AM2021-04-23T04:12:25+5:302021-04-23T04:12:25+5:30
-- वाघाळे : गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील मोहन धुमाळ यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना एकामागे एक ...
--
वाघाळे : गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील मोहन धुमाळ यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना एकामागे एक असे तीन बिबट्याचे बछडे आढळून आले असल्याने परिसरात खळबळ उडाली असून येथील बिबट्यांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी येथील शेतकरी करत आहेत.
गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील पद्मावती वस्ती येथे मोहन चंदर धुमाळ यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना ऊस तोड कामगारांना शेतात एकाच जागी बिबट्याची तीन बछडे दिसली. ऊस तोड कामगारांनी बिबट्याच्या एका पिल्लाला पकडून शेजारी असलेल्या कोंबडीच्या पिंजऱ्यात ठेवले आणि शेतमालक व इतरांना माहिती दिली. त्यांनतर बातमी वाऱ्यासारखी पसरली व शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनमजूर हनुमंत कारकुड, वन्य पशू-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शेरखान शेख, श्रीकांत भाडळे, अमोल कुसाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व बछड्याला ताब्यात घेतले.
परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. या तीन बछड्यांमुळे परिसरात बिबट्या असणारच असल्याचे सिध्द झाले आहे. या बछड्यांच्या शोधाता मादी बिबट्या परिसरात येईल व आता ऊसाची तोडणी झाल्यामुळे ती गावात, गोठ्यात शिरेल अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने ताबडतोब येथे पिंजरा लावावा अशी मागणी शेत मालक किसन धुमाळ, आदित्य धुमाळ, बंटी गावडे, श्रीकांत धुमाळ, गणेश धुमाळ, विनायक धुमाळ आणि ग्रामस्थांनी केली.
--
बिबट्याच्या तिन्ही बछड्यांना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. बछडे सुरशिक्षत असून माणसांच्या सहवासात आल्याने घाबरले आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात येईल.
मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर
--
फोटो २२ वाघाळे बिबट्या
फोटो ओळ : गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे आढळून आलेला बिबट्याच्या बछडा.