कळंबच्या सरपंचासह तीन सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:29 AM2017-08-09T03:29:51+5:302017-08-09T03:29:51+5:30

शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे विभागाचे अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी कळंब ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच शोभा प्रदीप पाटील (गायकवाड) यांच्यासह तीन सदस्यांना अपात्र ठरविले आहे.

Three members incompetent with Sarpanch of Kalamb | कळंबच्या सरपंचासह तीन सदस्य अपात्र

कळंबच्या सरपंचासह तीन सदस्य अपात्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर : शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे विभागाचे अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी कळंब ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच शोभा प्रदीप पाटील (गायकवाड) यांच्यासह तीन सदस्यांना अपात्र ठरविले आहे.
अप्पर आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोहर घोडके व गोरख खंडागळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कळंब हे इंदापूर तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव. सरपंचांसह विद्यमान सदस्य महादेव रामचंद्र खरात, रोहिणी शिवाजी कोळी व लक्ष्मी सुनील मोरे यांना अपात्र ठरवले आहे.
तसेच, राणी राजेंद्र पाटील यांनी अतिक्रमण केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध होत नसल्याने त्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून पात्र ठरत आहेत, अशी माहिती निकालाद्वारे अपिलार्थी यांना देण्यात आली आहे. पुणे येथील अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक १४१/२०१६ मध्ये १० जानेवारीला दिलेला आदेश रद्द करून वरील चार जणांना अपात्र ठरविले आहे.
येथील घोडके व खंडागळे यांनी अतिक्रमण केल्याप्रकरणी आमरण उपोषण केले होते. पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी जुजबी कारणे दाखवून संभ्रमित करणारा निकाल दिल्यानंतर, त्यांनी आयुक्तांकडे अपिलीय अर्ज दाखल केले. अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची खातेनिहाय चौकशीची मागणीबरोबर लवकर निकाल देण्यासाठी आत्मदहनाचा इशारा पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला. त्यानंतर दोन्ही बाजू जाणून घेऊन अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी ही अपात्रतेची कारवाई केली.
कळंब ग्रामपंचायतीच्या राजकारणात कायम अस्थिरता निर्माण होत असून विकासकामांना सतत खीळ बसत आहे. सध्या काँग्रेस पक्षाच्या प्रदीप पाटील यांच्या गटाचे, १० तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे ७ सदस्य आहेत.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करा
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते खंडागळे यांनी सांगितले की, विद्यमान सरपंच व इतर सदस्यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून पदाचा गैरवापर केला आहे. यापूर्वी देखील माजी सभापती प्रदीप पाटील सरपंच पदावर असताना, त्यांनी घरकुलप्रकरणी पदाचा गैरवापर करीत अक्षरश: जाती बदलून लाभ घेतल्यामुळे त्यांचे निलंबन झाले होते. आतादेखील शासकीय जागेमध्ये अतिक्रमण झालेले असताना अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी यापूर्वीचा निकाल जुजबी कारणे दाखवून संभ्रमित करणारा दिला. त्यामुळे काही दिवसांत अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी निलंबनाची मागणी करणार आहे. यावेळी प्रसंगी आमरण उपोषण करणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.

Web Title: Three members incompetent with Sarpanch of Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.