प्रेमविवाह केल्याने बहिणीच्या पतीचे भावांनीच केले अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 10:09 AM2018-08-30T10:09:45+5:302018-08-30T10:23:01+5:30
बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या पतीचे पिस्तूलाचा धाक दाखवून अपहरण करणाऱ्या दोन भावांसह तिघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या पतीचे पिस्तूलाचा धाक दाखवून अपहरण करणाऱ्या दोन भावांसह तिघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटात शोभावा असा पुणे ते माण तालुक्यामधील कुक्कडगावाच्या घाटात पोलिसांनी पाठलाग करुन विजय श्रीकांत दबडे (28) यांची सुटका केली. नंदू सुखदेव करांडे, नवनाथ काळेल, रणजित करांडे अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा विजय दबडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शोभा या कामानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांची जीममध्ये काम करणाऱ्या विजय दबडे बरोबर ओळख झाली. दोघांनी प्रेमविवाह केला त्याला विजयच्या कुटुंबाची मान्यता होती. परंतु, शोभाच्या घरच्यांचा या विवाहाला विरोध होता. शोभा यांनी 15 जुलै 2018 रोजी विवाह केल्यानंतर शोभाच्या नातेवाईकांनी शोभा व विजयला फोन करुन धमकाविले होते.
बुधवारी सकाळी विजय नेहमीप्रमाणे कामावर जात असताना सिंहगड रोडवरील नवले पुलाजवळ शोभाचा मावस भाऊ नवनाथ काळेल व सख्खा भाऊ नंदू करांडे यांनी त्याला पिस्तुलाचा धाक दाखवला. तसेच जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. विजय जीममध्ये आला नसल्याचे जीममधील एकाने शोभाला याबाबत कल्पना दिली. याप्रकरणी अधिक चौकसी केली असता विजयची गाडी रस्त्यावर आढळून आली तसेच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी पिस्तूलाचा धाक दाखवून विजयला काही जणांनी कारमध्ये घालून नेल्याचे सांगितले.
विजयचे अपहरण झाल्याचे समजताच सिंहगड रोड पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, स्मिता यादव, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी साळुंके, ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सुधिर घाडगे, विनोद महागडे, किरण देशमुख, संतोष सावंत, राहुल शेडगे, प्रशांत काकडे, विजय पोळ, संग्राम शिनगारे , निलेश जमदाडे, रफिक नदाफ या पथकाने याबाबत अधिक माहिती काढली.
पुणे, सोलापूर, सातारा ग्रामीण पोलिसांना फोन करुन वेळोवेळी मदत घेण्यात आली. मोबाईल तंत्रज्ञ राहुल शेडगे यांनी वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे आरोपीच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन काढून पोलिसांना दिले तसेच म्हसवड पोलीस ठाण्याचे मालोजी देशमुख व त्यांच्या पथकाने सहकार्य केले. पोलिसांनी पाठलाग करून अखेर सातारा जिल्ह्यातील माण कुक्कडगाव घाटात विजयची सुखरूप सुटका करून तिघांना ताब्यात घेतले.