पुणे जिल्ह्यात आता तीन मंत्री
By admin | Published: December 6, 2014 04:04 AM2014-12-06T04:04:41+5:302014-12-06T04:04:41+5:30
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कँटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांना मंत्रिपद मिळाले होते.
पुणे : पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कँटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांना मंत्रिपद मिळाले होते. कसबा मतदारसंघातून ५ वेळा सलग आमदार राहण्याची हॅट्ट्रिक करणारे गिरीश बापट यांच्या आणि शिवसेनेचे पुरंदरमधील आमदार विजय शिवतारे यांच्या रूपाने पुणे शहर व जिल्ह्यास आणखी दोन मंत्रिपदे मिळाली आहेत.
कसबा मतदारसंघाला बापट यांच्या रूपाने प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. पुरंदर तालुक्याला तत्कालिन कृषिराज्यमंत्री दादा जाधवराव यांच्यानंतर शिवतारे यांच्या रूपाने मंत्रिपद बहाल झाले आहे. कँटोन्मेंटला रमेश बागवे यांच्यानंतर पुन्हा मंत्रिपद बहाल झाले आहे .
भाजपाचे शिवसेनेशी मनोमिलन झाल्याने शिवतारे यांच्या मंत्रिपदावरही शिक्कामोर्तब झाले आहे. शिवतारे यांचे नाव ते निवडून आल्यानंतर मंत्रिपदासाठी घेतले जात होते. पुरंदर तालुक्यात पवार कुटुंबाशी सातत्याने करत असलेल्या संघर्षामुळे त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र पक्षाच्य प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नावही चर्चेत होते. मात्र, विस्तारात शिवतारे यांनी बाजी मारली.
आघाडी सरकार असताना पुणे जिल्ह्यात अजित पवार यांचे जलसंपदा व नंतरचे उपमुख्यमंत्रिपद, दिलीप वळसे पाटील यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद आणि नंतरचे ऊर्जामंत्रिपद, हर्षवर्धन पाटील यांचे सहकारमंत्रिपद, रमेश बागवे यांचे गृहराज्यमंत्रिपद, बाळासाहेब शिवरकर यांचे बांधकाम राज्यमंत्रिपद, चंद्रकांत छाजेड यांचे पर्यटनमंत्रिपद अशी मंत्रिपदाची १५ वर्षांत परंपरा होती. बारामती, इंदापूर आणि आंबेगाव या तालुक्यांचे मंत्रिपदांचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता कसबा आणि पुरंदर तसेच कँटोन्मेंट या मतदारसंघांमध्ये लाल दिवा झळाळणार आहे.
भाजपचे पूर्वीपासून प्रस्थ असलेल्या मावळ तालुक्यासही मंत्रिपद दिले जाईल अशी चर्चा होती.मात्र संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना ती संधी मिळाली नाही. पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता मावळली आहे.
(प्रतिनिधी)