तीन मिनिटांमध्ये एक्स्प्रेस हायवेवर
By admin | Published: January 2, 2017 02:19 AM2017-01-02T02:19:27+5:302017-01-02T02:19:27+5:30
भक्ती-शक्ती चौक ते किवळे या नवीन बीआरटी मार्गाची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. या मार्गाच्या निर्मितीमुळे निम्म्याहून अधिक किलोमीटरचा वळसा टळणार असून
पिंपरी : भक्ती-शक्ती चौक ते किवळे या नवीन बीआरटी मार्गाची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. या मार्गाच्या निर्मितीमुळे निम्म्याहून अधिक किलोमीटरचा वळसा टळणार असून, नव्या रस्त्यामुळे भक्ती-शक्ती चौकातून केवळ तीन मिनिटांत द्रुतगती महामार्गावर पोहोचता येणार आहे. त्यातून पैशांची आणि वेळेचीही बचत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षमीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात एकूण दहा मार्गांवर बीआरटी सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यांपैकी सांगवी ते रावेत, वाकड ते नाशिक फाटा या बीआरटीएस मार्ग सुरू झाले आहेत. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता, निगडी ते दापोडी, आळंदी फाटा ते देहूगाव या बीआरटी मार्गांचे काम सुरू आहे. निगडी ते दापोडी हा मार्ग डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. भक्ती शक्ती चौक ते किवळे मुकाई चौक या नवीन मार्गाचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. हा सुमारे सव्वापाच किलोमीटरचा रस्ता आहे. तो तीन टप्प्यांत विकसित करण्याचे काम सुरू केले आहे.
द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठी किंवा किवळे विकासनगर परिसरात जाण्यासाठी देहूरोड व दुसरा वाल्हेकरवाडीमार्गे, तिसरा आकुर्डीमार्गे डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय ते रावेत असा रस्ता आहे. भक्ती-शक्ती चौकातून बिजलीनगर पूल, चिंचवडे चौक, वाल्हेकरवाडी, रावेतचा बास्केट पूल, रावेतमार्गे किवळे-मुकाई चौकात जाता येते. हे अंतर सुमारे दहा किलोमीटर आहे. तसेच भक्ती
शक्ती चौकमार्गे देहूरोड, विकासनगर मार्ग ते मुकाई चौकही सुमारे नऊ किलोमीटर आहे. नवीन होणारा मार्ग हा पाच किलोमीटरचा आहे. त्यामुळे सुमारे पाच किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. (प्रतिनिधी)