तीन महिन्यांच्या चिमुरडीला सोपवून जन्मदाता पळाला
By admin | Published: April 25, 2015 05:18 AM2015-04-25T05:18:51+5:302015-04-25T05:18:51+5:30
गजबजलेला लष्कर परिसर...महात्मा गांधी रस्त्यावर विक्रेत्यांची गर्दी...लष्कर न्यायालयासमोरुन एक महिला सोने खरेदीसाठी जात होती
पुणे : गजबजलेला लष्कर परिसर...महात्मा गांधी रस्त्यावर विक्रेत्यांची गर्दी...लष्कर न्यायालयासमोरुन एक महिला सोने खरेदीसाठी जात होती...एक तरुण येतो... हातात तीन महिन्यांची तान्हुली असते...मी पार्क केलेली मोटार घेऊन येईपर्यंत तुम्ही हिला जवळ ठेवा, असे सांगून तो जातो...बराच वेळ झाला तरी तो परत येत नाही...दुपारच्या उन्हाच्या तडाख्यात ही तान्हुली रडायला लागते...महिलेला नेमके काय करावे कळत नाही...पोलिसांना बोलावले जाते आणि तान्हुली ससून रुग्णालयात पोहोचते. आई-वडिलांच्या वादात या तान्हुलीवर अनाथ होण्याची वेळ आली आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. लष्कर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील ३५ वर्षीय महिला सोने खरेदीसाठी जात होती. अडीचच्या सुमारास त्यांना एका तरुणाने
आवाज दिला.
साधारणपणे साडेसहा फूट उंच, रंगाने सावळा, अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाची पँट घातलेला हा तरुण हातामध्ये तीन महिन्यांची मुलगी घेऊन आला. अतिशय गोंडस आणि लाघवी असे बाळ पाहून ती महिला थांबली. ‘‘मी माझी गाडी जरा लांब पार्क केलेली आहे, ती मी घेऊन येतो. तो पर्यंत मुलीला तुमच्याकडे ठेवा’’ अशी विनंती त्याने केली.
ही विनंती मान्य करीत त्या महिलेने मुलीला स्वत:जवळ घेतले. या मुलीसोबत एक बॅगही त्याने या महिलेकडे दिली. बराच वेळ वाट पाहूनही हा तरुण काही परत येत नव्हता. या महिलेने मुलीला घेऊन तिच्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध लागला नाही. शेवटी न राहवून या महिलेने पोलिसांना कळवले. पोलिसांनी महिलेकडे चौकशी केल्यानंतर मुलीसोबत दिलेली बॅग तपासली. बॅगेतील चिठ्ठीवरून हा खुलासा झाला आहे.