तीन महिने लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:27 PM2019-05-07T18:27:27+5:302019-05-07T18:28:43+5:30
आरोपी हा २१ वर्षाचा असून तो मुलीच्या ओळखीचा आहे़. त्याने तिला आमिष दाखवून ८ फेब्रुवारीला पळवून नेले होते़
पुणे : चतु:श्रृंगी पोलिसांकडे एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार ८ फेबु्रवारी रोजी दाखल होती़. या मुलीला पळवून नेताना त्याने काहीही मागमूस ठेवला नव्हता़. तब्बल तीन महिन्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाला एक छोटासा धागा मिळाला़. त्यावरुन पोलिसांनी लवासाच्या डोंगरापलीकडे डोंगरात लपून बसलेल्या या दोघांचा शोध घेऊन मुलीची सुटका केली़.
आरोपी हा २१ वर्षाचा असून तो मुलीच्या ओळखीचा आहे़. त्याने तिला आमिष दाखवून ८ फेब्रुवारीला पळवून नेले होते़. तो मोबाईलही वापरत नव्हता़. तसेच कोणत्याही नातेवाईकाशी त्याने संपर्क साधला नव्हता़. त्यामुळे काहीही कळायला मार्ग नव्हता़. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक किरण अब्दागिरे यांना एक छोटासा धागा मिळाला़. त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर मुलगी व आरोपी हे मुळशी तालुक्यातील तव या गावी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली़.
सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे, हवालदार रमेश लोहकरे, ननिता येळे, राजेंद्र ननावरे, निलेश पालवे, संदीप गायकवाड आणि किरण अब्दागिरे हे पथक लवासाच्या पाठीमागील डोंगरात शोध घेऊ लागले़. या जंगलात काहीही माहित नसताना व हिंस्त्र प्राण्याची तमा न बाळगता ते तव गावाजवळच्या डोंगरावर शोध घेत राहिले़ तेव्हा त्यांना एक झोपडी दिसून आली़ त्यांनी तेथे जाऊन पाहिल्यावर या झोपडीत ही मुलगी होती़. आरोपीने आपल्या लांबच्या आजी, आजोबाबरोबर तिला ठेवले होते़ त्याने दररोज धान्य व अन्य साहित्य अगोदरच आणून ठेवले होते़. पोलिसांनी त्याला चतु:श्रृंगी पोलिसांच्या हवाली करुन मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले़.