Khadakwasla Dam: तीन दिवसांत तीन महिन्यांचा पाणीसाठा; खडकवासला धरण साखळीत ३.८५ टीएमसी पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:27 AM2023-07-21T10:27:54+5:302023-07-21T10:30:08+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६.४८ टीएमसीने म्हणजे, २२.१२ टक्के पाणीसाठा कमी आहे...
पुणे :खडकवासला धरण साखळी प्रकल्पांतील चारही धरणांत आतापर्यंत १२.९० टीएमसी म्हणजे, अवघा ४४.२६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दिलासादायक म्हणजे, अवघ्या तीन दिवसांत पुणेकरांना तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा धरणात जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६.४८ टीएमसीने म्हणजे, २२.१२ टक्के पाणीसाठा कमी आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. जुलै महिना निम्मा संपत आला. गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. १७ जुलै रोजी सायंकाळी ५ पर्यंत या चारही धरणांत ९.०५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत १२.९० टीएमसी म्हणजेच ४४.२६ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी २० जुलै या चारही धरणांत मिळून एकूण १९.३५ टीएमसी म्हणजे, ६६.३८ टक्के पाणीसाठा होता.
दिवसभरात झालेला पाऊस :
टेमघर - २० मि.मी.
वरसगाव - १७ मि.मी.
पानशेत - १७ मि.मी.
खडकवासला - १ मि.मी.
धरणांतील सद्य:स्थिती
धरण टीएमसी टक्के
खडकवासला १.१० ५५.५५
पानशेत ४.९७ ४६.६६
वरसगाव ५.७४ ४४.८१
टेमघर १.०९ २९.४५
एकूण १२.९० ४४. २६