पुणे : बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात आणखी ३ रुग्णालये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:38 AM2022-05-26T08:38:33+5:302022-05-26T08:40:57+5:30

कोल्हापूर येथील एका महिलेला १५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून तिची किडनी काढून घेण्यात आली होती...

three more hospitals in case of illegal kidney transplant pune crime news | पुणे : बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात आणखी ३ रुग्णालये

पुणे : बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात आणखी ३ रुग्णालये

googlenewsNext

पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील बेकायदा अवयव प्रत्यारोप प्रकरणाचे धागेदोरे आता अन्य राज्यांतही पोहोचले असून, वानवडीतील इनामदार हॉस्पिटल, ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल आणि कोइम्बतूर येथील के.एम.सी.एच हॉस्पिटल यांचा बेकायदा किडनी प्रत्यारोपणात सहभाग असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत रुबी हॉलमध्ये ४, इनामदार, ज्युपिटर आणि कोइम्बतूर येथील हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एक, अशा ७ बेकायदेशीरपणे शस्त्रक्रिया झाल्याचे आतापर्यंत पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले.

रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपणप्रकरणी पोलिसांनी अभिजित शशिकांत गटणे (वय ४०, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) या दोन एजंटांना अटक केली आहे. त्यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान गटणे, रोडगे व त्यांच्या अन्य एका साथीदाराने मिळून इनामदार, के.एम.सी.एच. व ज्युपिटर या तीन रुग्णालयांत बनावट नातेवाईक व कागदपत्रे दाखवून किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केल्याचे पोलिसांनी सांगितले. रुबी हॉलमध्ये समोर आलेल्या किडनी रॅकेटचे धागेदोरे थेट परराज्यातील कोइम्बतूरपर्यंत पोहोचले आहेत, तसेच राज्यातील इतर रुग्णालयांतदेखील किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

कोल्हापूर येथील एका महिलेला १५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून तिची किडनी काढून घेण्यात आली होती. तिला पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार तिने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून हे संपूर्ण किडनी रॅकेट समोर आले आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे साेपविण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी, फिर्यादी आणि संशयित यांचे जबाब आतापर्यंत नोंदविण्यात आले आहेत. साक्षीदारांनादेखील जबाब नोंदविण्यासाठी येण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. कोइम्बतूर आणि इनामदार हॉस्पिटलमध्ये झालेल्या अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत थेट रुबी हॉस्पिटलचा संबंध नसला तरी आरोपींच्या परस्परांशी संबंध असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Web Title: three more hospitals in case of illegal kidney transplant pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.