एका रात्रीत झाले तीन खून
By admin | Published: May 5, 2015 03:15 AM2015-05-05T03:15:14+5:302015-05-05T03:15:14+5:30
एकाच रात्रीत खुनाच्या तब्बल तीन घटना घडल्या असून, रविवारची रात्र खुनाची रात्र ठरली. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा
पुणे : एकाच रात्रीत खुनाच्या तब्बल तीन घटना घडल्या असून, रविवारची रात्र खुनाची रात्र ठरली. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस झोपा काढत असताना शहरातील रस्त्यांवर मात्र राजरोसपणे खुनाच्या घटना घडत चालल्या आहेत. दत्तवाडी आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये या तीन घटना घडल्या आहेत.
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकापाठोपाठ दोन खून झाले. रात्री दहाच्या सुमारास नितीन दत्तात्रय कसबे (वय २१, रा. अंबिल ओढा वसाहत, सिंहगड रस्ता) याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला. याप्रकरणी चैत्या रंधवे, श्रावण बुरुंगले, काळ्या रंधवे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अनिल दत्तात्रय कसबे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. नितीन कसबे याच्यावर रविवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास आंबिल ओढा वसाहतीमधील माजी
महापौर माऊली शिरवळकर यांच्या घराशेजारी हल्ला करण्यात आला. कसबे याला एकटे गाठून
त्याच्यावर कोयता, सत्तूरसारख्या हत्यारांनी वार करुन निर्घृण खून करण्यात आला.
आरोपींची नितीनसोबत जुनी भांडणे होती. आरोपी पूर्वी त्याच वस्तीमध्ये राहण्यास होते. सध्या आरोपी हडपसर भागात राहात आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव करीत आहेत.
खुनाची दुसरी घटना राजाराम पुलाजवळील वरद विनायक गणपती मंदिरामागे असलेल्या जागेवर घडली. दत्तात्रय मोतीराम पवार (वय ५५, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश मनोहर होळे (वय ३०, रा. दांडेकर पूल) याला अटक
करण्यात आली आहे. रविवारी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. पवार आणि होळे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रविवारी रात्री होळे याने पवार यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे द्यायला पवार यांनी नकार दिल्यामुळे चिडलेल्या होळेने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला.
तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात टाकून दिला.
होळे याने पवार यांचा खून
केल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, राम राजमाने
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पथकाने होळे याला अटक केली.
(प्रतिनिधी)