महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी तीन नवीन ऑनलाईन सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:25+5:302021-07-31T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी दि. १ ऑगस्टपासूनच राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या आणखी तीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी दि. १ ऑगस्टपासूनच राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या आणखी तीन नवीन ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये आतापर्यंत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध करून देण्यात आला असून, यापुढे डिजिटल स्वाक्षरीत फेरफार, नवीन सातबारा आणि मिळकत पत्रकांचे फेरफारदेखील ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या तिन्ही नवीन सुविधांचा आरंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा, आठ ‘अ’चा उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड फेरफार सहज व विना हेलपाट्याशिवाय मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला. राज्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून ऑनलाईन व डिजिटल सातबारा दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येत असून, दिवसाला तब्बल एक लाख डिजिटल स्वाक्षरीत सातबारे वापरले जात आहेत. या येत्या १ ऑगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरीत सातबाऱ्यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होणार असल्याचे या प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.
राज्यात सन २०१५-१६ पासून ऑनलाईन फेरफार मोहिम सुरू करण्यात आली. यात आतापर्यंत राज्यातील १ लाख ३६ हजार फेरफार ऑनलाईन करण्यात आले असून १ कोटी १८ हजार फेरफार डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध आहेत. आता हे सर्व फेरफार डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
------
राज्यात १ ऑगस्टपासून नवीन सातबारा
राज्यातील सातबाऱ्यात तब्बल पन्नास वर्षांनंतर बदल करण्यात आले आहे. नवीन सातबारा साधा, सहज समजेल व सुटसुटीत संगणकीय सातबाऱ्याच्या गरजा व सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत हा सातबारा तयार केला आहे. राज्यातील सर्व २ कोटी ४५ लाख सातबारे नवीन बदलासह तयार झाले असून, नागरिकांना १ ऑगस्टपासून नवीन सातबारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मिळकत पत्रकांचे फेरफार ऑनलाईन मिळणार आहेत.