आॅनलाइन फसवणुकीच्या तीन घटना
By admin | Published: October 7, 2016 02:56 AM2016-10-07T02:56:11+5:302016-10-07T02:56:11+5:30
आॅनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून, विविध आमिषे दाखवत तीन जणांना गंडवण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत
पुणे : आॅनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून, विविध आमिषे दाखवत तीन जणांना गंडवण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी चतु:शृंगी, विमानतळ आणि मुंढवा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात छाया प्रवीण अरोरा (वय ६८, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. अरोरा यांना राहुल शर्मा व त्याच्या चार साथीदारांनी मोबाईल तसेच लँडलाइनवर फोन करून एलआयसी हेड आॅफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना गोल्डन फाईलमध्ये निवड झाल्याचे सांगत २0 लाख मिळणार असल्याची बतावणी केली. या रकमेसाठी वेळोवेळी विविध खात्यांवर १४ लाख ४५ हजार रुपये भरायला भाग पाडत फसवणूक केली.
तर विमानतळ पोलिसांकडे प्रितीधारा साबत (वय २६, रा. कॅसल सोसायटी, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. साबत या खासगी कंपनीमध्ये संगणक अभियंता आहेत. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ई-मेल आयडीवरून इन्कम टॅक्स अकाऊंटचा पासवर्ड व गोपनीय माहिती परस्पर बदलून फसवणूक केली. तर रूपाली बाळकृष्ण शिंदे (वय ३५, रा. पवारवस्ती, मुंढवा) यांनी भारतीय किसान कॉलसेंटर विरुद्ध फिर्याद दिली आहे. या कॉलसेंटरद्वारे सीसीई पदासाठी भरती असल्याची जाहिरात देण्यात आली होती. शिंदे यांनी कॉलसेंटरमध्ये संपर्क साधल्यावर त्यांना नोकरी देण्याच्या आमिषाने खात्यावर वेळोवेळी ४६ हजार रुपये भरायला लावत फसवणूक केली.