राजगुरुनगर येथे तीन पतसंस्था फोडल्या
By Admin | Published: April 13, 2016 03:23 AM2016-04-13T03:23:56+5:302016-04-13T03:23:56+5:30
राजगुरुनगरमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, राजगुरुनगरमधील प्रमुख रस्ता असलेल्या तिन्हेवाडी रस्त्यावरील तीन ग्रामीण सहकारी बिगरशेती पतसंस्था मंगळवारी पहाटे
राजगुरुनगर : राजगुरुनगरमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, राजगुरुनगरमधील प्रमुख रस्ता असलेल्या तिन्हेवाडी रस्त्यावरील तीन ग्रामीण सहकारी बिगरशेती पतसंस्था मंगळवारी पहाटे चोरट्यांनी फोडल्या; मात्र त्या पतसंस्थांमध्ये काहीही रोकड किंवा ऐवज व्यवस्थापनांनी ठेवलेला नसल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. तरी, त्यांच्या या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नामुळे शहरात घबराट पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्हेवाडी रस्त्यावरील भैरवनाथ पतसंस्था, जोगेश्वरी पतसंस्था आणि कल्याणी महिला पतसंस्था अज्ञात चोरट्यांनी फोडल्या. या पतसंस्थांचे दरवाजे, शटर, कडीकोयंडे आणि कुलपे तोडून पतसंस्था चोरट्यांनी उघडल्या. त्यांमधील कपाटांची, रोखपालाच्या ड्रॉवरची उचकापाचक केली. साहित्य इतस्तत: फेकून रोकड आणि ऐवज मिळविण्यासाठी शोधाशोध केली; परंतु पतसंस्था त्यांची दिवसभराची रोकड व ऐवज यांचा संध्याकाळी जिल्हा बँकेत भरणा करीत असतात. यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
मात्र, ते पतसंस्थांपर्यंत पोहोचल्याने गावात घबराटीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
या पतसंस्थांच्या सुरक्षा उपकरणांच्या वायर त्यांनी सायरन वाजू नये म्हणून कापल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरटे तयारीचे असल्याचे आढळून आले आहे.