अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तिघांना बेड्या
By admin | Published: March 21, 2017 05:37 AM2017-03-21T05:37:20+5:302017-03-21T05:37:20+5:30
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन आणि ब्राऊन शुगरच्या तस्करीप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या असून, दोन वेगवेगळ्या
पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन आणि ब्राऊन शुगरच्या तस्करीप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या असून, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ४ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली.
नितीन सुभाष सूर्यवंशी (वय ३४, रा. दुर्गामाता कॉलनी, पिंपळे सौदागर, पिंपरी), गौरांग मनहरभाई शहा (वय ३४, रा. शांतीकुंज सोसायटी, बडोदा, गुजरात) या दोघांना मेफेड्रोनच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नीरज अर्जुन टेकाळे (वय २४, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याला ब्राऊन शुगरच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यवंशी आणि त्याचा साथीदार शहा हे दोघेही मोटारीमधून बावधन येथील सूर्यदत्ता महाविद्यालयासमोर येणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक अजय वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४ लाख २५ हजारांचे ८५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर नीरज हा पाटील इस्टेटमध्ये छुप्या पद्धतीने ब्राऊन शुगरची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे ५६ हजारांचे ११ ग्रॅम ब्राऊन शुगर मिळून आले. त्याने हे ब्राऊन शुगर अलिशेर लालमहंमद सौदागर आणि अशोक भांबुरे (दोघेही रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांच्याकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केला आहे.
दोन्ही कारवाया उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलीस निरीक्षक स्वाती थोरात, सहायक निरीक्षक संजय ठेंगे, अजय वाघमारे, अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, प्रफुल्ल साबळे, अमित छडीदार, स्नेहल जाधव, विनायक जाधव, राकेश गुजर, व्ठ्ठिलल खिलारे, राजेंद्र बारशिंगे, सचिन चंदन यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)