म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट उधळला; सूत्रधारासह तीन अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 05:48 AM2021-12-13T05:48:57+5:302021-12-13T05:49:30+5:30

परीक्षा न झाल्याने उमेदवारांना मनस्ताप. यापुढे परीक्षा म्हाडाच घेणार असल्याची आव्हाड यांची माहिती.

three people arrested before leaking mhada job exam papers exams will be held by themselves said awhad | म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट उधळला; सूत्रधारासह तीन अटकेत

प्रातिनिधीक छायाचित्र

googlenewsNext

पुणे : आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याचा कट उधळला. 

म्हाडाच्या विविध पदांसाठीच्या रविवारी होणार असलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम पुण्यातील जी. ए. साॅफ्टवेअरचे संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख यांना सोपविण्यात आले होते. त्यांनीच प्रश्नपत्रिका फोडण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या परीक्षांना सुमारे अडीच लाख परीक्षार्थी बसणार होते. आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवार परीक्षेसाठी रविवारी सकाळी राज्यातील विविध केंद्रांवर पोहोचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे कळल्याने त्यांना मोठा मन:स्ताप झाला. त्यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

पोलिसांंनी शनिवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत जी. ए. साॅफ्टवेअरचा संचालक  डाॅ. प्रीतिश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी, पुणे), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. तिघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हाडाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. रविवारी आयोजित म्हाडाच्या भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने ओैरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरातील संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली.

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पाॅइंट या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव व त्यांचा सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे म्हाडा परीक्षेतील ३ उमेदवारांची प्रवेशपत्रे, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील ३५ उमेदवारांच्या नावांची यादी सापडली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत डॉ. प्रीतिश देशमुख यांची माहिती मिळाली.

पुण्यात वास्तव्यास असलेले संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी म्हाडाची प्रश्नपत्रिका फोडून ती उमेदवारांना देण्याची तयारी सुरू केली होती. सायबर गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. विश्रांतवाडी येथे हरकळ आणि डॉ. देशमुख गाडीतून निघाले होते. पोलिसांच्या पथकाने गाडी अडवून तिघांना ताब्यात घेतले. झडतीत त्यांच्याकडे लॅपटॉप, ७ मोबाइल, पेन ड्राइव्ह, इतर कागदपत्रे सापडली. पेन ड्राइव्हमध्ये म्हाडाच्या तीनही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आढळल्या.

म्हाडाच घेणार यापुढे परीक्षा : आव्हाड
म्हाडातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदांवरील परीक्षेचा पेपर फुटण्याआधीच रद्द केला आहे; परंतु यापुढे असे गैरव्यवहार टाळण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेऐवजी म्हाडातर्फेच विविध पदांवरील उमेदवारांच्या भरतीचे पेपर तयार करून परीक्षा घेण्यात येतील. 

शिवाय, आताचे शुल्कही परत केले जाणार असून, पुन्हा परीक्षेचे शुल्कही घेतले जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यात केली. ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागल्यामुळे परीक्षार्थींना जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आव्हाड यांनी माफीही मागितली. ज्यांनी मेहनत घेऊन परीक्षेची तयारी केली होती. त्यांना या कारवाईमुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.

सीबीआय चौकशी करा
आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गोंधळानंतर आता म्हाडाच्या पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले. या सर्व प्रकरणांमध्ये कोणावरही दोषारोप होत नाही. या पेपरफुटीची सीबीआय चौकशी व्हायला हवी. परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, हाच काळा कारभार राज्यात चालला आहे.  
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

कोण आहे प्रीतिश देशमुख?
गेल्या काही वर्षांत राज्यात झालेल्या अनेक परीक्षा घेण्याची जबाबदारी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या जी. ए. सॉफ्टवेअरकडे होती. पोलीस भरतीची परीक्षाही घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांनी गोपनीयतेचा भंग करुन म्हाडाचा पेपर दुसऱ्याकडे सोपविला आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आरोपीच्या मोबाईलवर संपर्क साधून प्रश्नपत्रिका कधी मिळणार व कोठे मिळणार याबाबत विचारणा केली. देशमुख यांच्याकडे १०० जणांची यादी मिळाली. हा पेपर परीक्षार्थींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी कट उधळला आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

Web Title: three people arrested before leaking mhada job exam papers exams will be held by themselves said awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.