आळेफाटा येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील तीन जणांना हत्यारांसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 01:33 PM2019-07-03T13:33:18+5:302019-07-03T13:35:02+5:30
पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पर जिल्ह्यातील टोळीतील तीन जणांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली.
आळेफाटा : पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पर जिल्ह्यातील टोळीतील तीन जणांना आळेफाटा पोलिसांनी नाकेबंदीदरम्यान मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घातक हत्यारांसह जेरबंद करून अटक केली. या टोळीतील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
दरोड्याच्या तयारीत असलेल्या शंकर जाधव, गजानन नरवडे व ज्ञानेश्वर चौधरी (सर्व रा. गंगापूर नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक बाजूने आळेफाटा परिसरात मोटार कार (एमएच- 0२ एनए. ४३१९) पहाटेच्या वेळी आल्याचे नाकेबंदीवरील आळेफाटा पोलिसांचे निदर्शनास आले. कारमधील काही जणांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी कार बाजूस घेण्यास सांगितले असता कारमधील दोन जण उतरत पळून गेले. यानंतर पोलिसांनी आतील तीन जणांना पकडले. या तिघांची तसेच कारची झडती घेण्यात आली. त्या वेळी कटावणी,लोखंडी हुक, लाकडी दांडा असलेला हूुक, चाकू, कोयता, लोखंडी पाईप, स्क्रुड्रायवर, कटर, नायलॉन रस्सी, चिकटपट्टी बंडल, प्लॅस्टिक दांडा, दोन मिरची पुड, दोन मोबाईल ही हत्यारे त्यांच्याकडून मिळाली आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, फौजदार राहुल गोंदे, पोलीस कर्मचारी महेश पठारे, नीलकंठ कारखिले, हरिश्चंद्र करे, जालिंदर रहाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना जुन्नर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले.
.......
दरम्यान, आरोपींकडील कार पोलिसांनी जप्त केली आहे. कांचा व संतोष (पूर्ण नावे समजली नाहीत) हे दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या टोळीतील तिघा जणांनी आळेफाटा परिसरातील पेट्रोलपंप लुटायला आले असल्याची कबुली पोलिसांना दिली.