मिलिंद एकबोटेंवर शाई फेकल्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 08:44 PM2018-03-20T20:44:14+5:302018-03-20T20:44:14+5:30
न्यायालयाच्या परिसरात वकीलाच्या वेशात असलेल्या संजय वाघमारे याने मिलिंद एकबोटेंवर शाई फेक केली.
पुणे : समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन आगरकर यांनी २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
संजय हरिदास वाघमारे (वय ३१, रा. अप्पर बिबवेवाडी), विठ्ठल अशोक खाडे (वय २३, रा. मांगडेवाडी, कात्रज) आणि अवदेश श्रीलालजी यादव (वय २७, अप्पर इंदिरानगर) अशी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मिलिंद एकबोटे यांना कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोठडी सुनावल्यानंतर त्यांना घेवून जात असताना न्यायालयाच्या बाहेर पडताच वकीलाच्या वेशात असलेल्या संजय वाघमारे याने एकबोटेंवर शाई फेक केली. तसेच पोलिसांना धक्काबुक्की करून त्याने सरकारी कामात आणला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. एकबोटे यांच्यावर शाई झाल्यानंतर कोर्टात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर समस्त हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोर्टात येऊन घोषणबाजी केली. तसेच, शाईफेक करणा-याला ताब्यात देण्याची मागणी केली.
वाघमारे हा गनिमीकावा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष असून इतर दोघे या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे आणखी कोणी साथीदार याप्रकरणात समाविष्ट आहेत का ?तसेच संजय हा सराईत वृत्तीचा असून त्याच्यावर यापूवीर्ही गुन्हे दाखल आहे. त्याला हा गुन्हा करण्यासाठी कुठल्या संघटनांनी सांगितले का ? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील संजय दिक्षीत यांनी तिघांच्याही पोलीस कोठडीची मागणी केली. याला बचावपक्षाच्या वतीने आलूर असोसिएटचे वकील रणजीत ढोमसे-पाटील आणि अॅड. अकुंश जाधव यांनी विरोध केला. तिघांनाही न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र , न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.