Pune | गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या तिघांना खडक पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 02:31 PM2023-04-12T14:31:57+5:302023-04-12T14:32:36+5:30
पुण्यात रेशनिंग दुकानदारांकडून बेकायदेशीररित्या धान्य विकत ते बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन निघालेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली
पुणे : रेशनिंग दुकानदारांकडून बेकायदेशीररित्या धान्य विकत ते बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन निघालेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. भवानी पेठेतील कासेवाडी येथे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी २ हजार ७०० किलो तांदळाच्या ५४ गोण्या जप्त केल्या आहेत. खडक पोलिसांनी ही कारवाई केली.
जावेद लालू शेख (३५), अब्बास अब्दुल सरकावस (वय ३४) आणि इम्रान अब्दुल शेख (वय ३०) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस शिपाई महेश जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कासेवाडी परिसरात रेशनिंग दुकानातील अन्नधान्याचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कासेवाडीतील राजीव गांधी सोसायटीच्या समोर रस्त्यावर उभा असलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ताब्यात घेतला. त्यातील स्वस्त धान्य दुकानातील २ हजार ७०० किलो तांदूळ घेऊन ते बाजारात विक्रीसाठी निघाले होते. पोलिसांनी टेम्पो आणि तांदूळ असा एकूण ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक काळे अधिक तपास करत आहेत.