खून प्रकरणात तिघांना अटक, पोलीस कोठडी सुनावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:11 AM2018-08-25T02:11:22+5:302018-08-25T02:11:59+5:30
तलवारीने वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आमिन शब्बीर शेख, शादाब ऊर्फ मोनू आसिफ
पुणे : तलवारीने वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आमिन शब्बीर शेख, शादाब ऊर्फ मोनू आसिफ अन्सारी, नदीम अहमद शेख (तिघेही वय १९, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
निहाल ऊर्फ गंड्या जनार्दन लोंढे (वय १९, रा. येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल सतीश कांबळे (वय १९, रा. येरवडा) गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जनार्दन वसंत लोंढे (वय ३८, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. २२ आॅगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
लोंढे यांचा मुलगा निहाल, त्याचा मित्र राहुल याच्यासोबत दुचाकीवरून बाहेर गेले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्याने लोंढे आणि त्यांचे जावई त्याला शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी डेक्कन कॉलेज रोड येथे तीन ते चार लोकांंनी निहाल याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. तर राहुल याच्यावर वार करून गंभीर जखमी केल्याचे लोंढे यांना समजले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त करण्यासाठी, त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का? हा गुन्हा त्यांनी नक्की कोणत्या कारणासाठी केला? याचा शोध घेण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी त्यांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.