डीएसकेंच्या जावयासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 09:01 PM2018-05-16T21:01:33+5:302018-05-16T21:05:38+5:30
डीएसकेंच्या व्यवहाराच्या अनेक बाबी जावई केदार वांजपे यांना माहिती आहेत़. त्यांची पत्नी सई वांजपे हिच्या नावावर डीएसके यांनी अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या़.
पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़. एस़. कुलकर्णी यांच्या जावयासह तिघांना पुणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे़. केदार वांजपे, सई वांजपे आणि वरिष्ठ अधिकारी धनंजय पाचपोर अशी त्यांची नावे आहेत़. डी़एस़के आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी हे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, डी़ एस़ कुलकर्णी यांचे जावई केदार वांजपे हे पूर्वी त्यांच्याकडे कामाला होते़. त्यांना त्यांच्या व्यवहाराच्या अनेक बाबी माहिती आहेत़. त्यांची पत्नी सई वांजपे हिच्या नावावर डीएसके यांनी अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या़. त्यांना यातील अनेक व्यवहारांची माहिती आहे़. तसेच, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या कंपनीतील २००७ -०८ पासून जमिनीचे सर्व प्रमुख व्यवहार धनंजय पाचपोर हे पाहत होते़. त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये पाचपोर यांचा महत्त्वाचा वाटा आहे़. त्यांच्या उद्योग-व्यवसायामधील प्रमुख सूत्रधार पाचपोर यांचा असल्याचे सांगितले जाते़.
या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते़. सायंकाळपर्यंत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतरही त्यांच्याकडून माहिती दिली जात नसल्याने पोलिसांनी त्यांना सायंकाळी अटक केली, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली़. केदार वांजपे हे डीएसके यांच्या भावाचे जावई आहेत़. केदार आधी डीएसके यांच्या समवेत काम करत होते़. ड्रीमसिटीसाठी जागा खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती़. आर्थिक कारणावरुन वाद झाल्याने ते २००९ साली ते डीएसके यांच्यापासून वेगळे झाले़.
आर्थिक अडचणीत आल्यानंतर डी़ एस़ कुलकर्णी यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आमच्याच नातेवाईकांनी अडचणीत आणले़ असे म्हणत केदार वांजपे यांच्यावर कंपनीतील माहिती माझ्या विरोधकांना पुरविली़. गुंतवणुकदारांच्या बैठकीतील संभाषणापैकी डीएसके यांचे दीड हजार रुपयांचे चेक परत जातात़ पत्नीला मुर्ख म्हणालो, असा व्हिडिओ काटछाट करुन व्हायरल केला़. त्यामुळे अफवा पसरुन आमच्या अडचणीत वाढ झाली, असे सांगितले होते़. त्यानंतर केदार वांजपे यांनी डीएसके यांनी जाहीर माफी मागावी, नाही तर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते़. आता पोलिसांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही अटक केली आहे़. डी़ एस़ कुलकर्णी यांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात सध्या आर्थिक गुन्हे शाखा आरोपपत्राची तयारी करत असून काही हजार पानांचे हे आरोपपत्र गुरुवारी न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे़.