'61 दिवस' सुरक्षित राहणाऱ्या पुण्यातील जनता वसाहतीत कोरोनाचा शिरकाव,तीन नागरिकांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 06:24 PM2020-05-16T18:24:13+5:302020-05-16T18:31:54+5:30
'नो कोरोना पॅटर्न'ला काही प्रमाणात तडा गेला असला तरी नियंत्रित करण्याकरिता प्रयत्न सुरु
पुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या दिवसापासून (9 मार्च ते 14 मे) या तब्बल 61 दिवसांमध्ये कोरोनापासून सुरक्षित राहिलेल्या 'जनता वसाहत' झोपडपट्टीतील तीन रहिवासी बाधित झाले आहेत. वास्तविक यातील दोन रुग्ण हे अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुदैवाने या तीनही रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील (क्लोज कॉन्टॅक्ट) सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जनता वसाहतीच्या 'नो कोरोना पॅटर्न'ला काही प्रमाणात तडा गेला असला तरी त्याला नियंत्रित करण्याकरिता प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
शहरातील जनता वसाहत ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. तब्बल 100 एकरांचा परिसर या वसाहतीने व्यापलेला आहे. गरीब-कष्टकरी जनतेची वसाहत असलेल्या या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये याकरिता स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या. महापालिका, पोलीस आणि स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी मिळून आतापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राबविल्या. वसाहतीमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून कालव्यावरुन जाणारे पाणी पुरवठ्याच्या वाहिन्यांवरही पत्रे लावण्यात आले आहेत.
नागरिकांसाठी अल्पदरात भाजीची व्यवस्था करण्यात आली असून पालिकेच्या दवाखान्यात स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ अनेकजण घेत आहेत. वस्तीमध्येच रेशन, अन्नधान्य आणि भाजीपाला उपलब्ध झाल्याने नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले असून केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच सोडले जात आहे.
वसाहतीमधील दोघे जण ससून आणि एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील आठवड्याभरापासून हे दोघे दवाखान्यात उपचार घेत आहेत. हे दोघेही कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. या दोघांच्या निकटच्या संपकार्तील सर्वांची तपासणी करण्यात आली. परंतू, सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे या दोघांना कोरोनाची लागण वसाहतीमध्ये झाली की दवाखान्यात याबाबत रहिवासी शंका उपस्थित करु लागले आहेत. या दोघांसोबत आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले असून त्याच्याही निकटच्या संपकार्तील सर्व व्यक्ती निगेटीव्ह आल्या आहेत.