मासे आणण्याचा अट्टहास बेतलं जीवावर ; माणिकडोह धरणात होडी उलटल्याने तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 08:50 PM2019-05-24T20:50:11+5:302019-05-24T21:04:56+5:30
होडी धरणाच्या मध्यभागी गेल्यावर अचानक उलटली...
जुन्नर : तालुक्याच्या तालुक्याच्या आदिवासी भागातील केवाडी गावाच्या पिछाडीला असलेल्या माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मच्छीमारांकडुन मासे आणण्यासाठी होडीत बसुन गेलेल्या तीन तरूण होडी उलटल्याची घटना शुक्रवारी (दि २४) सकाळी घडली. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून दुपारी तीनही तरूणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
गणेश भाऊ साबळे (वय २२, रा. निमगिरी), स्वप्नील बाळू साबळे (वय २२, रा. निमगिरी), पंढरीनाथ मारुती मुंढे (वय २५, रा. पेठेची वाडी) अशी बुडालेल्या तरूणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेसातच्या वेळेस हे तीन तरूण मासे आणण्यासाठी मच्छीमारांच्या होडीत (मच्छीमारांचा तराफा) धरणात गेले. यावेळी होडीत आठ जण होते. होडी धरणाच्या मध्यभागी गेल्यावर अचानक उलटली. यावेळी आठही जण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. यातील ५ जणांनी बाहेर पोहत येऊन आपले प्राण वाचविले. तर तीन तरुण मात्र पाण्यात बुडाले होते.
स्थानिकांनी जुन्नर पोलिसांना याची माहिती दिल्यावर जुन्नर पोलीस तसेच ग्रामस्थांनी बेपत्ता तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना यश मिळाले नाही. यामुळे एन.डी.आर.एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले. दोन बोटी आणि आठ जवानांनी बेपत्ता तरूणांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह दुपारनंतर पाण्यातुन शोधून बाहेर काढले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार परप्रांतीय मच्छीमार पाण्याच्या पलीकडे होते. या तरुणांनी मासे घेण्यासठी पलीकडे जाण्याचे ठरवले. मच्छीमारांनी या तरुणांना पाणी ओलांडुन येवू नका आम्ही तुमच्याकडे येतो असे सांगितले. तरुणांना होडीत बसण्यास रोखले होते. परंतु त्यांनी बळजबरीने होडीत बसण्याचा केलेला अट्टाहास त्यांच्या अंगाशी आला. काही अंतरावर गेल्यानंतर होडी उलटल्याने होडीत असणारे ऐकून ८ ग्रामस्थ पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. ५ जणांनी बाहेर पोहत येऊन आपले प्राण वाचविले तर गणेश भाऊ साबळे, स्वप्नील बाळू साबळे, पंढरीनाथ मारुती मुंढे यांचा बुडून मृत्यू झाला. यातील मुंढे हा विवाहित होता तर इतर दोघे जण अविवाहित होते. होडी चालविणारा परप्रांतीय मच्छीमाराला देखील पोहता येत नव्हते तो देखील गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याला काठावरील मच्छीमारांनी वाचविले. तर गटांगळ्या खाणा-या या तरुणांनी वाचण्यासाठी एकमेकांना मिठ्या मारल्याने काठापासून अवघ्या १० फुट अंतरावर १२ फुट खोलीच्या पाण्यात हे तरुण बुडाले.