जबरी चोरी करणारे तीन जण जेरबंद
By admin | Published: February 19, 2017 04:29 AM2017-02-19T04:29:43+5:302017-02-19T04:29:43+5:30
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जबरी चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे. त्यांनी २ जबरी चोऱ्या व १ दुचाकीची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.
जेजुरी : पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जबरी चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे. त्यांनी २ जबरी चोऱ्या व १ दुचाकीची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी नीलेश पांडुरंग धोत्रे नितीन मच्छिंद्र माने (दोघेही रा. शिरूर, सिद्धार्थनगर) व रोहिदास सूर्यकांत गुंजाळ (रा. शिरूर रामलिंग) या तिघांना जेरबंद केले आहे.
या तिघांनी २८ जानेवारी रोजी रात्री जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत सासवड-यवत रोड येथे पिक-अपचालक सतीश तात्याबा थोरात (वय ३४, रा. खुटबाव, ता. दौंड) यांना मारहाण केली होती. त्यांच्याकडील रोख ३ हजार रुपये व मोबाइल असा ६ हजार ५० रुपये किमतीचा माल जबरीने लुटला होता.
जिल्ह्यातील व पर-जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली असता नगर जिल्ह्यात जुून २०१५ मध्ये नीलेश धोत्रे व नितीन माने (दोघे रा. शिरूर) यांनी पिक-अपचालकास लुटल्याच्या गुन्ह्यात ते सध्या जेलमधून जामिनावर सुटल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने त्यांची माहिती काढली असता नीलेश धोत्रे, नितीन माने, रोहिदास गुंजाळ यांच्याकडे नंबर नसलेली बजाज पल्सर २२० गाड्या असून ते वाहनचालकांना रस्त्यात अडवून लूटमार करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांच्यावर पाळत ठेवून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर २२० ही ओतूर (ता. जुन्नर) येथून चोरल्याचे सांगितले. तसेच गुन्हा करताना तुकाराम ऊर्फ महाराज काशिनाथ जाधव (वय ३९, रा. गिरीम जाधववाडी, दौंड) याचे मारुती सेलेरिओ (एमएच ४२ एएच १५७०) या चारचाकी वाहनात जाऊन टेहळणी करायचे व येणे-जाणेसाठी गाडी वापरायचे अशी माहिती दिली. आरोपी तुकाराम जाधव फरारी झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचाही माग काढून त्यास दिनांक १६ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन जेजुरी पोलीस स्टेशनचे स्वाधीन केले आहे.