स्वच्छ शहरांमध्ये पुणे महापालिकेला 'थ्री स्टार' प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 01:42 PM2020-06-25T13:42:43+5:302020-06-25T13:43:26+5:30

स्पर्धेत नंबर घसरल्याने पालिकेने केले होते अपील

Three Star certificate to Pune Municipal Corporation in clean city survey | स्वच्छ शहरांमध्ये पुणे महापालिकेला 'थ्री स्टार' प्रमाणपत्र

स्वच्छ शहरांमध्ये पुणे महापालिकेला 'थ्री स्टार' प्रमाणपत्र

Next

पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराचे मानांकन घसरलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला असून स्वच्छ शहरांच्या यादीत पुण्याला 'थ्री स्टार' मानांकन मिळाले आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या मानांकनामुळे पालिकेला ऐन कोरोना काळात आनंददायी बातमी मिळाली आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये महापालिकेचे मानांकन घसरून ते थेट ३७ व्या स्थानी गेले होते. पालिकेने या सर्वेक्षणासाठी शहरातील भिंती रंगविण्यापासून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईल रिंगटोन बदलण्यापर्यंत सर्व गोष्टी केल्या होत्या. सार्वजनिक स्वच्छतेसोबतच जनजागृती, लोक प्रबोधन यावरही भर दिला होता. स्वच्छ सर्वेक्षणासाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला होता. सल्लागाराची नेमणूकही करण्यात आली होती. सफाई कर्मचारी, घंटागाड्या, कचरा वाहनाऱ्या गाड्या, कचऱ्याचे व्यवस्थापन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. 

या स्पर्धेत १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आल्या ४२५ शहरांनी भाग घेतला. परंतु, केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीत पालिकेला कमी गुण मिळाले होते. शहराचे मानांकन ३७ वर घसरले होते. यावरून विरोधी पक्षांनी मुख्यसभेमध्ये प्रशासन आणि सत्ताधारी यांना धारेवर धरले होते. महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाला पत्र पाठवीत सर्वेक्षणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच विश्लेषणात चुका झाल्याची शक्यताही वर्तविली होती. देशभरातून अशा ३८ पेक्षा अधिक शहरांनी अशाच स्वरूपाची पत्र पाठवीत सर्वेक्षणातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यावर केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाने पत्र पाठविलेल्या सर्व शहराच्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला. तसेच त्याची पडताळणी केली. यामध्ये पालिकेला 'थ्री स्टार' रेटिंग मिळाले आहे. 
-------------
सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे
१. शहरातील स्वच्छता
२. ओढे - नाले स्वच्छता
३. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता
४. निवासी-व्यवसायिक संकुलांची स्वच्छता
५. झोपडपट्टयांमधील स्वच्छता

Web Title: Three Star certificate to Pune Municipal Corporation in clean city survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.