‘थ्री स्टार’ रेटिंग स्वच्छतेचा फुगा फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:19 AM2019-03-07T01:19:38+5:302019-03-07T01:19:47+5:30

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१९मध्ये पुणे महापालिकेने स्टार रेटिंगमध्ये स्वत:ला ‘थ्री स्टार’ रेटिंग देण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता;

'Three Star' Rating Cleanliness bubble bursts | ‘थ्री स्टार’ रेटिंग स्वच्छतेचा फुगा फुटला

‘थ्री स्टार’ रेटिंग स्वच्छतेचा फुगा फुटला

Next

पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१९मध्ये पुणे महापालिकेने स्टार रेटिंगमध्ये स्वत:ला ‘थ्री स्टार’ रेटिंग देण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता; परंतु यासाठी असलेल्या शंभर टक्के घरांमध्ये जाऊन कचरा गोळा करणे, गोळा केलेल्या ८० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करणे, तब्बल ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे, मुळा-मुठा नद्यांची स्वच्छता, शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी अशा अनेक मुद्द्यांवर हे थ्री स्टार रेटिंग देणार होते. यासाठी आयुक्त, महापौर यांच्यासह सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले खरे; परंतु गेल्या अनेक वर्षांत न झालेली कामे केवळ दीड महिन्यात करण्याचे सोंग आणले गेले. पण, या ‘थ्री स्टार’ रेटिंग स्वच्छतेचा फुगा केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये फुटला आहे. यामुळेच स्वच्छतेचा टक्का गत वर्षापेक्षा घटला असून, दहावरून १४वा क्रमांक मिळाला आहे. तर, राज्यात दुसºया क्रमांकावरून थेट आठव्या क्रमांकावर फेकले गेलो.
स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९अंतर्गत सर्व महापालिकांच्या हद्दीतील स्वच्छतेचे मूल्यांकन शासनाच्या वतीने केले. यामध्ये प्रत्येक शहरास १ ते ७ स्टार रेटिंग दिले. यासाठी महापालिकेकडून स्वत:ला कोणत्या रेटिंगमध्ये प्रस्ताव दाखल करण्याचे स्वातत्र्य दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने थ्री स्टार रेटिंगसाठी अर्ज दाखल केला होता. केंद्र शासनाकडून त्रयस्थ संस्थेमार्फत ४ जानेवारीपासून सलग २८ दिवस
या थ्री स्टार रेटिंग मूल्यांकनाची तपासणी केली.
पुणे महापालिकेला या थ्री स्टार रेटिंगसाठी १०० टक्के घरोघरी कचरा संकलन करणे, १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण करणे, शहरातील १०० टक्के व्यावसायिक ठिकाणी लिटरबिन्स लावणे, १०० टक्के व्यावसायिक ठिकाणांची दिवसातून दोन वेळा साफसफाई करणे, १०० टक्के कचºयावर प्रक्रिया करणे, एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करणे, १०० टक्के आॅनलाईन तक्रारींचे निवारण करणे, शहरात निर्माण होणारा १०० टक्के कचरा गोळा करणे, नदी, नाले, तलाव आदी ठिकाणांची साफसफाई करणे, शहरातील नागरिक व संस्थांना वापरकर्ता शुल्क लागू करणे व शहरात १०० टक्के प्लॅस्टिकबंदी करणे आदी मुद्द्यांची तपासणी केली. परंतु, यापैकी अनेक मुद्द्यांमध्ये महापालिका मागे पडली असून, थ्री स्टारची अवास्तव अपेक्षा ठेवली. प्रत्यक्ष कामापेक्षा अधिकचे स्टार रेटिंग दिल्याने महापालिकेचे थेट २०० गुण कमी केले असून, केंद्र शासनाने पुणे महापालिकेला टू स्टार रेटिंग दिले.
>स्वच्छ सर्वेक्षणासाठी सल्लागाराचा सल्ला
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअतंर्गत स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने केवळ तीन महिन्यांसाठी ‘केपीएमजी अ‍ॅडव्हायझरी प्रा.लि.’ या खासगी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. संबंधित सल्लागारांनी शासनाच्या नामांकनानुसार कोणत्या विभागात महापालिका कमी पडते व त्याची पूर्तता करणे आणि सर्वेक्षणासाठी आवश्यक ते दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) करण्याचे काम या संस्थेला दिले होते. परंतु, दस्तावेजीकरणामध्येदेखील कमी पडल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
>स्वच्छ सर्वेक्षणासाठी
खूप कष्ट घेतले
महापालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी गेले तीन-चार महिने सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व नगरसेवक यांनी खूप कष्ट केले. नामांकनानुसार बहुतेक सर्वच पातळ्यांवर चांगले काम झाले आहे. परंतु, काही भागात कमी गुणे मिळाल्याने पुणे शहराच्या स्वच्छतेचा क्रमांक घसरला. आता या वर्षी अधिक चांगले काम करणार असून, वर्षभर नियमितपणे स्वच्छतेसाठी काम करण्यात येईल.
- मुक्ता टिळक, महापौर
>लोणावळा स्वच्छ शहर
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण २०१९मध्ये लोणावळा शहराला ‘पश्चिम भारतातील दुसºया क्रमाकांचे स्वच्छ शहर’ पुरस्कारप्राप्त झाला. दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोणावळा नगर परिषदेला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. ‘पर्यटननगरी’ अशी ओळख असलेल्या लोणावळा शहराचा आज दिल्लीत स्वच्छतेच्या बाबतीतदेखील डंका वाजला आहे.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती पूजा गायकवाड, ब्रिंदा गणात्रा यांनी हा सन्मान स्वीकारला. मावळचे आमदार संजय भेगडे, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, नगरसेवक राजू बच्चे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब जाधव, रघुवीर शेलार, वीजवितरण समितीचे सदस्य सुनील तावरे हे या वेळी उपस्थित होते.
वरसोली येथील कचरा डेपोवर बायोगॅस प्रकल्प, तसेच कचºयापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविला. या सर्व कार्याची दखल घेऊन लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसºया क्रमाकांचे स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी लोणावळा या स्पर्धेत सातव्या स्थानावर होते. वर्षभराच्या काळात लोणावळा शहराने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू होण्यापूर्वीपासून म्हणजेच २०१७ पासून लोणावळा शहरात स्वच्छतेचा जागर सुरूझाला होता. मागील दोन वर्षांत नगर परिषदेने घरोघरचा कचरा शंभर टक्के गोळा करण्याचे शिवधनुष्य पेलले. सोबतच शहरातील सर्व कचराकुंड्या हटवून लोणावळा शंभर टक्के कचराकुंडीमुक्त बनविले. घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्याने नागरिकांनीदेखील शहर स्वच्छ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Web Title: 'Three Star' Rating Cleanliness bubble bursts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे