येरवड्यातील तरुणाच्या खूनप्रकरणी तीन संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:08 PM2018-08-24T18:08:51+5:302018-08-24T18:14:40+5:30
येरवडयातील खूनप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विमाननगर : येरवडयात अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला होता. या खूनप्रकरणीपोलिसांनी तीन संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी गुरुवारी (दि. २३ऑगस्ट ) ताब्यात घेतले. खून झालेल्या निहाल लोंढे याचे वडील जनार्दन लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला होता. बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास निहाल जनार्दन लोंढे (वय १९ रा. भीमक्रांती मंडळाजवळ लक्ष्मीनगर येरवडा) हा त्याचा मित्र राहुल कांबळे यांच्यासह बाहेर जाऊन येतो असे सांगून गेला होता. रात्री दहा वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी वडील जनार्दन व मेहुणे नागेश कांबळे हे पर्णकुटी पायथाकडे निहाल व राहुल कांबळे याला अनोळखी तीन ते चार इसम धारदार शस्त्राने मारत होते. या घटनेत निहालचा जागीच मृत्यू झाला तर राहुल गंभीर जखमी झाला.
दरम्यान, या घटनेमुळे गुरुवारी रात्री ससून रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताबयात घेणार नाही अशी भूमिका निहालच्या नातेवाइकांनी घेतली होती. मात्र, रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर गुरुवारी सकाळी निहालचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला.येरवडा स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता निहालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निहालच्या घरापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासासाठी येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली होती. येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने तीन संशयित हल्लेखोरांना गुरुवारी ताब्यात घेतले. या गंभीर घटनेतील जखमी राहुल कांबळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर करत आहेत .