पुण्यात स्वाइन फ्लूचे ३ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 03:06 AM2017-07-25T03:06:25+5:302017-07-25T12:42:54+5:30
दमट हवा, पाऊस अशा बदलत्या वातावरणात स्वाइन फ्लूचा शहरातील विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दमट हवा, पाऊस अशा बदलत्या वातावरणात स्वाइन फ्लूचा शहरातील विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. पुण्यात स्वाइन फ्लूच्या विषाणूने आणखी तीन जणांचा बळी घेतला. आतापर्यंत शहरात ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी २२ जण पुण्यातील रहिवासी होते.
मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. भोर येथील ४६ वर्षीय महिलेस मधुमेहाचा त्रास होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप अधिक वाढल्याने त्यांना २१ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २२ जुलै रोजी महिलेला स्वाइन फ्लूचे निदान झाले. २३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
वडगाव बुद्रुक भागात राहणाऱ्या ५२ वर्षीय रुग्णास मधुमेह होता. उपचारास विलंब झाल्याने रुग्णाचे काही अवयव निकामी झाले होते. या रुग्णास १५ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालात त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. सोमवारी सकाळी मृत्यू झाला.
औरंगाबादमधील ५३ वर्षीय रुग्णाला अस्थमाचा त्रास होता. रुग्णाचा ताप वाढल्याने २९ जून रोजी त्याला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. ३० जून रोजी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला.